कराड प्रतिनिधी | विमल आणि रजनीगंधा गुटख्याची चोरटी वाहतूक करण्याच्या इराद्याने आलेल्या संशयिताला पाठलाग करून पोलिसांनी पकडले. त्याच्या कारची झडती घेतली असता कारमध्ये विमल आणि रजनीगंधा गुटखा आढळून आला. याप्रकरणी ४ लाखांचा गुटखा आणि कार, असा पावणे पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
अवैध गुटख्याची चोरटी वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश डीवाएसपी अमोल ठाकूर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी पोलिसांना दिले होते. दरम्यान, भरत मोहनलाल जैन (रा. शुक्रवार पेठ, कराड) हा गुटख्याची चोरटी वाहतूक करण्यासाठी शुक्रवार पेठेत येणार असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड आणि त्यांच्या पथकाला कारवाई करण्याची सूचना केली.
सपोनि गणेश कड यांच्यासह पोलीस अंमलदार मोहसिन मोमिन, अनिल स्वामी, आनंदा जाधव, समिर पठाण, महेश पवार यांनी शुक्रवार पेठेत छापा टाकला. पोलिसांना पाहून संशयित पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्यास पकडले. त्याच्या फोर्ड कंपनीच्या विन्टो कारची झडती घेतली असता कारमध्ये गुटखा आढळून आला. गुटखा आणि कार, असा ४,७१,२०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सरकारतर्फे अन्न सुरक्षा अधिकारी आय. एस. हवालदार यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश कड, उपनिरीक्षक पतंग पाटील, हवालदार शशिकांत काळे, अशोक वाडकर, अमित पवार, अनिल स्वामी, संदीप कुंभार, मोहसिन मोमिन, आनंदा जाधव, समिर पठाण, महेश पवार, अमोल देशमुख, मुकेश मोरे, धीरज कोरडे, दिग्विजय सांडगे, हर्षद सुखदेव, संग्राम पाटील, सोनाली पिसाळ, सपना साळुंखे यांनी ही कारवाई केली.