सातारा प्रतिनिधी । खिंडवाडी (ता. सातारा) येथे एका हॉटेल व्यावसायिकाला तसेच मॅनेजरला मारहाण करून काऊंटरमधील पैसे घेऊन जाण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी आशुतोष हिंदूराव माने (रा. धनगरवाडी, कोडोली, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रशांत नानासो मुळीक (रा. न्यू विकासनगर, सातारा), चेतन रमेश तरटे (रा. विकासनगर, सातारा), प्रसाद नितीन साखरे (रा. सदर – बझार, सातारा) आणि निखिल उर्फ बिटक्या (पूर्ण नाव नाही, पत्ता नाही) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
दि. १४ जानेवारीला रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार खिंडवाडी येथे एका लॉजमध्ये घडला. यातील तक्रारदार आशुतोष माने व मॅनेजर इरफान (पूर्ण नाव नाही) हे बसले होते. त्यावेळी संशयित कॅश काऊंटरवर येऊन मॅनेजरला शिवीगाळ करू लागले. यादरम्यान, माने यांनी शिवीगाळ का करता, असे विचारले. यावरून चौघांनी तक्रारदार आणि इरफान यांना हात आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काऊंटरमधील ६ हजार रुपयांची रोकड काढून घेत जीवे मारण्याची धमकी दिली. सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.