सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात हनी ट्रॅपची घटना घडल्याचे समोर आले आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकवून एकाचे अपहरण, मारहाण करून 15 लाख रुपयांची मागणी करत 3 लाख रुपये स्वीकारल्या प्रकरणी एका महिलेसह 5 जणांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने साताऱ्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित व्यावसायिकाची एका महिलेशी व्हॉट्सअॅपवर ओळख झाली. त्यातून त्या महिलेने व्यावसायिकास फोन केला. सेंट्रिंगचे काम मिळवून देते असे आमिष दाखवून ती व्यावसायिकास सातारा- कास रस्त्यावर पेट्री (ता. सातारा) येथे घेऊन गेली. तेथे व्यावसायिकास काम दाखविले. काम दाखवून झाल्यावर तिने त्याला एकीव फाट्यावरील एका लॉजवर नेले. त्यानंतर संबंधित महिला त्याला कासला फिरायला घेऊन गेली.
कास परिसरात फिरून परतत असताना चार अनोळखी व्यक्तींना तिने बोलावून घेतले होते. त्या सर्वांनी मिळून व्यावसायिकाला एका पांढऱ्या रंगाच्या गाडीत मारहाण करून बसविले.
त्यानंतर त्यांनी ती गाडी वेचले (ता. सातारा) येथे नेली. तेथे एका खोलीत अंगावरील सर्व कपडे काढून व्यावसायिकाला त्यांनी बांधून ठेवले. त्यानंतर त्या चौघांनी माझ्या बहिणीला लॉजवर नेण्याची हिंमत कशी केली, असे म्हणत व्यावसायिकाला मारहाण केली. त्यानंतर त्या महिलेने व्यावसायिकाकडे १५ लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून व्यावसायिकाने पत्नीला फोन केला. एकाच्या माध्यमातून वेचले येथे पैसे पाठविण्यास सांगितले.
त्यानुसार पत्नीने तीन लाख रुपये एका युवकामार्फत पाठवून दिले. त्यानंतर दोन दिवसांत आणखी दोन लाख रुपये देण्याची मागणी करत संशयितांनी व्यावसायिकाला सोडून दिले. घडलेल्या प्रकारामुळे व्यावसायिकाला धक्का बसला. त्यातून सावरल्यावर त्याने काल तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. उपनिरीक्षक गुरव तपास करत आहेत.