कराडातील महिला डॉक्टरच्या ‘त्या’ अश्लील व्हिडिओप्रकरणी दोघांवर गुन्हा

0
1081
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | संपूर्ण सातारा जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली. कराड शहरातील महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर व एका युवक-युवतीची एआय तंत्रज्ञानाद्वारे अश्लील व्हिडिओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी शहरातील एकासह पंजाबमधील एकावर गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. राजेश मारुती शिंदे (रा. शिंदे मळा, बाराडबरी, कऱ्हाड) व विकास विद्याभूषण शर्मा (वय ५५, रा. सुहाना, जि. मोहाली, पंजाब) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दोन डॉक्टरांसह दोन सामाजिक कार्यकर्त्यांच्या छायाचित्रे व व्हिडिओचा वापर करत त्यांचा अश्लील व्हिडिओ बनवण्यात आल्याची तक्रार पोलिसात झाली. त्यानंतर तपासातून प्रकार उघड झाला.

पंजाबमधील संशयित शर्मा याला पैशांची गरज असल्याने त्याने येथील शिंदे याच्या सांगण्यावरून व्हिडिओ तयार केल्याची माहिती चौकशीत समोर आली. त्यामुळे शहर पोलिसांनी चौकशीसाठी पंजाबला गाठले होते. त्यावेळी संशयित शर्मा याला पायाला गंभीर दुखापत असल्याने उपचार सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी केवळ शर्माचा मोबाईल आणि अन्य साहित्य जप्त केले आहे, तर मुख्य सूत्रधार डॉ. राजेश शिंदे हा आजारी असून, त्याच्यावरही उपचार सुरू आहेत.

विकास शर्माच्या चौकशीतून राजेश शिंदे याचे नाव समोर आले. त्यामुळे दोनवेळा शिंदेला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती पाहून त्यास घरी सोडण्यात आले. आवश्यकतेनुसार संबंधित संशयिताची चौकशी केली जाणार आहे.

पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आंदेलवार, उपनिरीक्षक निखिल मगदूम यांच्या पथकाने ही कारवाई केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक ताशीलदार तपास करत आहेत.