जयपूरात भरधाव आलेल्या कारची दुचाकी व छोटा हत्तीला (टेम्पो) जोराची धडक; दुचाकी चालक ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | रहिमतपूर-औंध मार्गावरील जयपूर, ता. कोरेगाव येथे भरधाव आलेल्या कारची दुचाकी व छोटा हत्तीला (टेम्पो) जोराची धडक बसली. या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला. अपघातानंतर कार चालक पसार झाला असून या घटनेची रहिमतपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

विक्रांत शंकर लिगाडे (वय 27, मूळ राहणार वाघोलीवाडी, सध्या राहणार सदर बझार सातारा) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.

याबाबत रोहित सुरेश पवार (रा. वडोली निळेश्वर, ता.कराड) यांनी रहिमतपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, विक्रांत लिगाडे हे माळी हाऊस सर्वेअर या कंपनीत सर्वेअर म्हणून गेले तीन वर्षांपासून काम करतात. ते शुक्रवारी दुचाकी (क्र. एमएच 11,एएम 8916) वरून सकाळी सातार्‍यावरून जायगाव ता. खटाव येथे निघाले होते. ते जयपूर येथे आले असता औंधहून भरधाव आलेल्या कार (क्र. एमएच 10, डीक्यू 7191) ची दुचाकीसह रस्त्यावरुन निघालेल्या छोटा हत्ती (टेम्पो) (क्र. एमएच 11, सीएच 6515) ला जोराची धडक दिली. ही धडक ऐवढी भीषण होती की अपघातानंतर कार पलटी होवून फरफटत काही अंतर जावून थांबली. तर जोराची धडक बसल्याने दुचाकी चालक गाडीसह रस्त्याच्या बाजूच्या सिमेंटच्या नाल्यात फेकला गेल्याने तो जागीच ठार झाला. अपघातात तीन्ही वाहनांचे नुकसान झाले या अपघातानंतर कार चालक पसार झाला आहे. याप्रकरणी रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार शंकरराव घाडगे करत आहेत.