कराड प्रतिनिधी | कराडजवळ हवालाची तीन कोटींची रक्कम लुटल्याची घटना आठवड्यापूर्वी घडली होती. त्याच्याशी साधर्म्य असणारी आणखी एक घटना पाचवड (ता. वाई) येथे महामार्गावर घडली. परंतु, रक्कम लुटीचा बनाव भुईंज पोलिसांनी अवघ्या तीन तासात उघडकीस आणला.
कोल्हापुरातील व्यावसायिकाची १ कोटी ४० लाखांची रक्कम पुण्यातून कोल्हापूरला घेऊन जाताना सातारा जिल्ह्यातील पाचवड (ता. वाई) हद्दीत ती अज्ञातांनी लुटल्याचा कार चालकाचा बनाव भुईंज पोलिसांनी तीन तासात उघडकीस आणला. कार चालक आणि कोल्हापूर सीआयडीमधील त्याच्या हवालदार मित्रानेच ही लूट केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी कार चालक नीलेश शिवाजी पाटील (रा. भैरवनाथ मंदिराजवळ, पाचगाव) याला पोलिसांनी अटक केली असून सीआयडी हवालदार अभिजीत शिवाजीराव यादव (रा. पिरवाडी, ता. करवीर) हा रक्कम घेऊन पसार झाला आहे.
कार चालकाने रचला बनाव
कोल्हापुरातील व्यावसायिक मनोज मोहन वाधवानी यांची व्यवसायातील रक्कम पुण्यातून आणण्यासाठी त्यांनी बदली कार चालक नीलेश पाटील याला पुण्याला पाठवले होते. रक्कम घेऊन परत येताना मध्यरात्री एकच्या सुमारास चालकाने वाधवानींना फोन केला. पोलिसांची गाडी माझा पाठलाग करीत आहे. मी काय करू? असं त्याने विचारलं. वाधवानींनी त्याला गाडी बाजूला घेऊन पोलिसांशी बोलायला सांगितलं. पुन्हा पंधरा मिनिटांनी चालकाचा वाधवांनींना फोन आला. घाबरल्यामुळे मी गाडी सोडून पळून गेलो होतो. थोड्या वेळाने परत आल्यानंतर कारमधील १ कोटी ४० लाखांची रक्कम लंपास झाली होती, असं त्यानं सांगितलं.
पोलिसी खाक्या दाखवताच बनाव उघड
व्यावसायिक वाधवानींना या घटनेबद्दल शंका आल्याने त्यांनी चालकाला पोलिस ठाण्यात जायला सांगितलं. ते स्वतः पहाटे भुईंज पोलिस ठाण्यात पोहोचले. कार चालक लुटीची घटना रंगवून सांगत होता. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने सीआयडीमध्ये हवालदार असलेल्या मित्राकडे रक्कम देऊन आपण लुटीचा बनाव केल्याची कबुली दिली. त्यानंतर वाधवानी यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.
कोल्हापूर सीआयडी विभागात खळबळ
लूट प्रकरणातील कार चालकाचा मित्र अभिजीत यादव हा कोल्हापूर सीआयडी कार्यालयात कार्यरत आहे. घटनेदिवशी रात्री उशिरापर्यंत तो कार्यालयात होता. लुटीच्या गुन्ह्यात त्याचा समावेश असल्याची माहिती मिळताच सीआयडी कार्यालयात एकच खळबळ उडाली. वरिष्ठांनी तातडीने त्याला कार्यमुक्त केले. सध्या तो पसार असून भुईंज पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहे.
असा आहे रक्कम लुटीचा घटनाक्रम
पुण्यात रक्कम ताब्यात मिळताच कार चालक नीलेश पाटीलने सीआयडी हवालदार अभिजीत यादवला फोन करून बोलवून घेतले. साताऱ्यातील पाचवड (ता. वाई) येथे दोघांची भेट झाली. चालकाने पैशांची पिशवी यादवकडे दिली आणि वाधवानीना फोन करून लुटीचा बनाव केला. आपण घाबरून कार सर्व्हिस रोडवर सोडून पळून गेलो. गडबडीत दरवाजा लॉक करायचा राहिला. काही वेळाने परत आलो, तर अज्ञातांनी रक्कम गायब केली होती, असा बनाव चालकाने रचला होता.