सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील बागेवाडी येथील धोंडिराम सदाशिव पाचांगणे यांच्या वस्तीवरील घरासमोर बांधलेल्या चार महिन्यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून वासरू ठार केले. बिबट्याच्या हल्ल्यात अन्य एक वासरू व एक शेळी जखमी झाली आहे. बिबट्याच्या वावराने बागेवाडी, बरड, जावली परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
फलटण पूर्व भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. बिबट्याने बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास धोंडिराम पाचंगणे यांच्या वस्तीवरील घरासमोर बांधलेल्या वासरावर हल्ला केला.
तीन-चार दिवसांपूर्वी जावली परिसरातील विशाल मोरे यांची दोन वासरे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली आहेत. बिबट्याचा परिसरात वावर असल्याने शेत वस्तीवरील लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा.
ज्या शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.