सातारा प्रतिनिधी | केळवली, ता. सातारा येथील रमेश धोंडीबा जांगळे (वय २५) या युवकाच्या खुनाचे धक्कादायक कारण समोर आले आहे. घरासमोरून जेसीबी नेण्यासाठी जांगळे याने आडकाठी आणल्याच्या रागातून जानकर बंधूनी शिकारीसाठीच्या बंदुकीतून गोळी घालून त्याची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी शंकर दादू जानकर आणि चिमाजी दादू जानकर (रा. केळवली, ता. सातार), या सख्ख्या भावांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेली बंदूक पोलिसांनी जप्त केली आहे.
मृत रमेश जांगळे आणि जानकर बंधूमध्ये जेसीबी घरासमोरुन नेण्यावरुन वाद झाला होता. या वादातूनच जानकर बंधूनी जांगळे यांचा नित्रळ गावच्या हद्दीत गोळी घालून त्याचा खून केला. रमेशचा मृतदेह सिमेंटच्या पाईपमध्ये सापडला. रमेश आणि जानकर बंधूच्या वादाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कौशल्याने खुनाच्या गुन्हयाची उकल केली. शिकारीच्या बंदुकीचा हत्येसाठी वापर केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी ती बंदक जप्त केली. दरम्यान, शवविच्छेदनात मृताच्या शरीरातून काढलेले छर्रे आणि बंदूक फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जानकर बंधू आणि मृत रमेश जांगळे यांच्यामध्ये यापूर्वी अनेकदा पैशावरुन वाद झाले होते. त्यासंदर्भात सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद देखील आहे. तात्कालीक कारणानुसार जांगळे यांच्या घरासमोरुन जानकर यांनी जेसीबी नेल्याने त्यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. जांगळे नडत असल्यानेच जानकर बंधूनी त्याचा काटा काढल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे.