गप्पा मारत निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; Briza कार पलटी होऊन एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड- पाटण रस्त्यावर भरधाव वेगाने Briza कार घेऊन जात असताना कार अचानक पलटी होऊन यामध्ये दोघा मित्रांचा अपघात झाल्याची घटना पाटण तालुक्यातील मल्हारपेठजवळील आबदारवाडी हद्दीत घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दुसरा मित्र गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात घराचे तसेच गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

सागर दिनकर माथणे (वय- 35, रा. नाडे) या एसटी महामंडळातील पाटण आगाराचे चालकाचा मृत्यू झाला आहे. तर विशाल हणमंत पानस्कर (वय- 24, रा. मल्हारपेठ) हा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नाडे येथील सागर माथणे व मल्हारपेठ येथील विशाल पानस्कर हे दोघेजण ब्रिजा गाडी क्रमांक (MH-50-1-1700) मधून नाडे नवारस्ता येथून निसरे फाट्याकडे निघाले होते. मात्र, गाडीचा वेग जास्त असल्याने चालक सागर माथणे याचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी बोर्डला धडकली.

धडक एवढ्या जोराची होती की गाडीने 2-3 पलटी मारून कमानी शेजारील घरात घुसली. या अपघातात चालक सागर माथणे यांच्या डोक्याला व हाताला जबर मार लागला. अपघात घडताच पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांनी वाहने थांबविली. आणि तात्काळ अपघात जखमी झालेल्या सागर व त्यांचा मित्र विशाल याला कराड येथे उपचारासाठी तात्काळ हलविले. मात्र, उपचार सुरू असताना सागर माथणे याचा मृत्यू झाला, तर विशाल पानस्कर हा देखील गंभीर जखमी आहे. या भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असून घराचेही मोठे नुकसान झाले आहे. पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास पोलिस हवालदारच एन. के. कांबळे करत आहेत.