प्रवाशांनी भरलेल्या ST बसचा ब्रेक झाला फेल; भीषण अपघातात 1 महिलेचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पुण्याहून महाबळेश्वरच्या दिशेने निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसचा बुवा साहेब मंदिराजवळ अचानक ब्रेक फेल झाला. ब्रेक फेल झाल्यानंतर बस पाठीमागे येत असताना चालकाने बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. पण बस पाठीमागे सरकल्याने पाठीमागून आलेल्या दुचाकीवर बस गेल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. प्रीती योगेश बोधे (४०) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या किसन वीर कॉलेज येथे प्राध्यापिका होत्या. हा अपघात रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाई तालुक्यातील महाबळेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या बसचा (क्रमांक MH 06S 8054) पसरणी घाटात ब्रेक फेल झाला. चालकाच्या ही बाब लक्षात येताच चालकाने बस कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत बस नाल्याच्या दिशेने घसरली. दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वारास पाठीमागे बस येत असल्याचे समजले नाही. त्यामुळे बस खाली दुचाकी (क्रमांक MH11 AU 6067) सापडल्याने दुचाकीवरील दोघेही बसच्या पाठीमागील बाजूस सापडले. त्यात महिलेचा मृत्यू झाला.

प्रीती योगेश बोधे असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. वाई येथील किसन वीर महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालय विभागात प्राध्यापिका होत्या. सायंकाळी कॉलेजला सुट्टी झाल्यानंतर त्या पतीसमवेत वाई येथील डी मार्टमध्ये साहित्य घेऊन ते दोघे पाचगणीला जात होते. या अपघातात योगेश बोधेही जखमी झाले आहेत. योगेश हे पाचगणी येथील सेंट पीटर निवासी हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. या अपघातातील पती-पत्नींना तात्काळ वाई येथील खासगी वाहनाने दवाखान्यात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला.

अपघातात सुदैवाने बस दरीमध्ये जाता जाता बचावली. बस संरक्षक कठड्याला अडकली नसती, तर बस ४०० ते ५०० फूट खोल दरीत कोसळून मोठा अनर्थ घडला असता. बसमध्ये साधारणतः २० ते २५ प्रवाशी प्रवास करत असल्याचे समजले आहे. ही बस महाबळेश्वर मुक्कामी जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. हा अपघात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत वाई पोलिसात झालेली नव्हती.