कराड प्रतिनिधी | एका शाळेजवळ दुचाकीवरून निघालेल्या पिता पुत्रावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना कराड तालुक्यातील उंडाळे येथील शेवाळवाडी रस्त्यावर घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जयवंत शेवाळे हे मुलगा प्रतीकला घेवून दुचाकीवरून उंडाळे येथे आठवडी बाजारासाठी आले होते. रविवारी सायंकाळच्या सुमारास बाजार करून परत जात असताना शेतातून अचानकपणे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात पाठीमागे बसलेल्या प्रतीक गंभीर जखमी झाला. प्रसंगावधान राखत शेवाळे यांनी दुचाकी वेगाने पुढे नेत बिबट्याच्या तावडीतून बचाव केला.
जखमी प्रतीकला तातडीने उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती स्थिरइ आहे. शेवाळे यांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. हल्ल्यामुळे पिता-पुत्र दोघेही घाबरले होते. परिसरातील नागरिकांनी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.