सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान सोहळ्याला नेण्यासाठी शिंदे सरकारनं ४०० एसटी बसेस बुक केल्या आहेत. या गाड्या भरण्यासाठी गावोगावच्या तलाठी, ग्रामसेवकाना, कामाला लावल आहे. सकाळी ८ वाजता बसेस गावांमध्ये उभ्या करण्यात आल्या आहेत. मात्र, तीन तास झाले तरी गाड्या निम्म्याही भरलेल्या नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविकांनाही सक्ती
मोठ्या गावांमध्ये प्रत्येकी एक एसटी बस पाठवण्यात आली आहे. सकाळी ८ वाजता बसेस गावांमध्ये पोहोचल्या आहेत. गावोगावच्या अंगणवाडी सेविकांनाही या सोहळ्यासाठी जाणे बंधनकारक केलं आहे. मात्र, त्यांना अंगणवाडीच्या गणवेशात नाही तर सामान्य पेहरावात यायला सांगण्यात आलं आहे. तलाठी, ग्रामसेवक एसटी बस भरण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, बसेस भरल्या नसल्याचे चित्र अनेक गावांमध्ये दिसत आहे.
तलाठी, ग्रामसेवकांना एसटी गाड्या भरण्याचं काम
साताऱ्यातील लाडकी बहीण सन्मान सोहळ्यासाठी पाठवलेल्या एसटी बसेस भरण्यासाठी गावोगावच्या ग्रामसेवक, तलाठ्यांना कामाला लावलं आहे. प्रत्येक गावात शासकीय अधिकारी, कर्मचारी महिलांना कार्यक्रमाला नेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, कार्यक्रमाला जाण्यास लाडक्या बहिणी उत्सुक नसल्याचे पाहायला मिळत आहे.
एसटीअभावी सामान्य प्रवाशांचं हाल
लाडकी बहीण सन्मान सोहळ्यासाठी एसटी गाड्या बुक करण्यात आल्यानं ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. यामुळे सामान्य प्रवाशांचं हाल सुरू आहे. दुर्गम भागातील नागरीकांना खासगी वडापचा आधार घ्यावा लागत आहे. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महामार्गावरील अवजड वाहतूक पाच तास बंद
दरम्यान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पुण्याहून साताऱ्याला बाय कार येणार असल्यानं महामार्गावरील अवजड वाहने सब वे वर उभी करण्यात आली आहेत. पाच तास वाहने जागीच थांबविण्यास पोलिसांनी सांगितलं असल्याचं वाहनधारक सांगत आहेत. त्यामुळे महामार्गाच्या सब वे वर अवजड वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत.