Crime News : प्रेमप्रकरणातून जखिणवाडीत भरदिवसा खून केलेल्या मोक्कातील टोळीप्रमुखाला जामीन मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील जखिणवाडी येथे 9 वर्षांपुर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील टोळीवर मोक्का लावण्यात आला होता. या टोळीचा प्रमुख दीपक पाटील याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी होऊन उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मकरंद कर्णिक यांनी त्यास जामीन मंजूर केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जखिणवाडी येथे दि. 9 जून 2014 रोजी मयूर गोरे याचा भरदिवसा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. प्रेमप्रकरणाच्या कारणावरुन हा हल्ला झाला होता. या गुन्ह्यात दिपक पाटील हा मुख्य संशयीत आहे. त्याच्याविरोधात कराड येथील शहर पोलीसात गुन्हा दाखल आहे. त्याच्यासोबत वैभव माने हा सहआरोपी आहे. संबंधित गुन्ह्याचा तपास करताना अनेक बाबी पोलिसांच्या निदर्शनास आल्या होत्या. त्यानुसार त्या टोळावर पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली.

त्या टोळीचा प्रमुख दिपक पाटील असल्याचे पोलिसांनी नमूद केले होते. त्यानंतर दीपक पाटील याने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी काम पाहिले होते. अ‍ॅड. निकम यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. नऊ वर्षापासून संशयीत तुरुंगात आहे. मात्र, अद्यापही सत्र न्यायालयात  याबाबतचा खटला प्रलंबित आहे. साक्षीदारांच्या जबाबातही विसंगती आहे, अशी बाजू अ‍ॅड. निकम यांनी मांडली.

तो युक्तिवाद ग्राह्य धरत एखादा खटला खुपकाळ प्रलंबित असेल तर संशयीताच्या संविधानिक अधिकारांचा भंग होतो. त्यामुळे संशयीताला योग्य अटींवर जामीनावर सोडता येते, असा दाखला अ‍ॅड. निकम यांनी दिला. त्यानुसार न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने अ‍ॅड. निकम यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून दीपक पाटील याला अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे.