कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील टेंभू येथील धरणातील टप्पा क्रमांक एक ब धरण परिसरात बारावीची परीक्षा दिलेली एका युवती मित्रांच्यासमवेत रंगपंचमी खेळताना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बुडाली होती. चार तासाच्या प्रयत्नानंतर युवतीचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. टेंभू बोगदा संपल्यानंतर सांगली जिल्ह्यातील खंबाळे बोगद्यामध्ये युवतीचा मृतदेह आढळून आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील टेंभू गाव परिसरातील टेंभू धरण टप्पा क्रमांक एक ब धरण परिसरात रंगपंचमी खेळण्यासाठी आलेल्या मित्रांसोबत आलेली एक युवती धरणामध्ये दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी रंगपंचमी खेळत असताना युवतीसह तिच्या दोन सहकारी मित्रांचा पाय घसरला आणि त्यांचा तोल जाऊन ते तिघेही पाण्यात पडले. पाण्यात पडल्यानंतर बुडालेले युवक पाण्यातून बाहेर आले. मात्र, युवती पाण्यात वाहून गेली. घटना घडल्यानंतर युवकांनी याबाबतची माहिती स्थानिक नागरिक व पोलिसांना आली.
माहिती मिळाल्यानंतर कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे यांच्यासह कर्मचारी दाखल झाले. याठिकाणी पोलिसांनी जवळपास चार तास शोध मोहीम राबविली. चार तासानंतर युवतीचा मृतदेह आढळून आला. कराडमध्ये राहणाऱ्या अठरा वर्षीय जुही घोरपडेने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. रंगपंचमीच्या दिवशी कराड तालुक्यात युवतीचा बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.