सातारा प्रतिनिधी | कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात गुरुवारी वादळामुळे स्पीड बोट उलटल्याने एकजण बुडाला होता. त्याचा मृतदेह रविवारी पाण्यावय तरंगताना आढळून आला. गजेंद्र राजपुरे, असे मृताचे नाव आहे. कायदेशीर सोपस्कार पार पाडून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, तेटली (ता.जावली) हद्दीत शिवसागर जलाशयात टी अँड टी कंपनीची स्पीड बोट वादळी वाऱ्याने पलटी होऊन यात बोटीसह एक जण बुडाला होता, तर दोघे पोहून सुखरूप बाहेर निघाले होते. दरम्यान, गेले तीन दिवस महाबळेश्वर ट्रेकर्स, स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून शोधकार्य सुरू होते. मात्र, मृतदेह सापडत नव्हता.
रविवारी सकाळी राजपुरे यांचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळून आला. मेढा पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महेश शिंदे व विजय शिंगटे अधिक तपास करत आहेत.