सातारा प्रतिनिधी । धोम- बलकवडी कालव्यात पोहण्यासाठी गेलेला तरुण दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्याची शोधमोहीम सुरू असताना खंडाळ्यानजीक कालव्यात त्याचा मृतदेह आढळून आला. मच्छिंद्र गोपाळ रोमण (वय ३६, रा. रोमणवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील अतिट येथील यात्रेसाठी मच्छिंद्र रोमण आला होता. तो मित्रांसह धोम- बलकवडी कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने रोमण बुडाल्याची घटना शनिवारी घडली होती.
दोन दिवसांपासून त्याचा शोध सुरूच होता. दरम्यान, आज हरिपूर- पवारवाडी गावच्या हद्दीत खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या कॅनॉलच्या पुलाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात झाली आहे.