साताऱ्यातील पुरातन विहिरीत आढळला 31 वर्षीय तरुणाचा मृतदेह

0
7

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील माची पेठेत साई धाम मंदिराच्या परिसरात पुरातन २०० वर्षापूर्वीची विहिर आहे. या विहिरीत गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कुबट वास स्थानिकांना आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले. यावेळी विहिरीत सडलेल्या अवस्थेत अनोळखी तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना निदर्शनास आला.

ज्ञानेश्वर बजरंग शिंदे (वय ३१, रा. माची पेठ, सातारा) असे तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, त्याची माहिती स्थानिकांनी सातारा शहर पोलिसांना दिली. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हात्रे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल होवून त्यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी शिवेंद्रराजे ट्रेकर्स यांना बोलवले आणि मृतदेह बाहेर काढले. शिंदे हे ३ रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झालेली होती.

ज्ञानेश्वर शिंदे हा शुक्रवार, दि. ३ रोजी सकाळी चालण्यासाठी घराबाहेर पडला; मात्र दुपारपर्यंत तो घरी न आल्याने तो गायब असल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. पुरातन विहिरीला खाली उतरण्यासाठी पायऱ्या नाहीत, तसेच ७० फूट खोल विहीर असल्यामुळे मृतदेह बाहेर काढताना जवानांना मोठी कसरत करावी लागली. अर्ध्या तासात जवानांनी मृतदेह बाहेर काढला.