कराड प्रतिनिधी । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या सातारा व कराड दाैऱ्यावर येत आहेत. या पार्श्ववभूमीवर माहिती देण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी आज कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. जेव्हा यांच्याकडे मंत्रिपद होते तेव्हा यांनी कराड उत्तरामध्ये विकासकामासाठी निधीवर निधी मंजूर करून आणला. त्यांनी दुसऱ्यांना कधी निधी दिला नाही. आता आम्ही आमच्या उपमुख्यमंत्री व बांधकाम मंत्र्यांकडून कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील कामासाठी निधी आणतोय. तर त्यावर यांच्याकडून आक्षेप घेतला जातोय. आम्ही कधी न केलेल्या कामांचे श्रेय घेतले नाही. या उलट यांच्यावर त्यांनी केलेल्या कामांची माहिती देण्याची वेळ का आली? याचा विचार त्यांनी करावा, असा टोला भाजप धैर्यशील कदम यांनी माजी पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांचे नाव न घेता लगावला
कराड येथील शासकीय विश्रामगृहात आज जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एकनाथ बागडी, कराड दक्षिणचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, महेश जाधव, माजी नगरसेवक सुहास जगताप, अजय पावसकर, मुकुंद चरेगावकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष कदम म्हणाले कि, सातारा लोकसभा मतदारसंघ भाजप सर्व ताकदीनिशी लढवणार आहे. कारण आमच्यासोबत सर्वजण आहेत. सातारा लोकसभा मतदार संघात आज भाजपाची ताकद मोठी आले. सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट देखील लोकसभेला भाजपाला नक्कीच मदत करेल यात शंका घेण्याचे काहीच कारण नाही.
पालकमंत्री असताना निधी देत नव्हते आता त्यांना कसा मिळणार? जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदमांचा आ. बाळासाहेबांवर निशाणा
BJP प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या सातारा-कराड दौऱ्यावर pic.twitter.com/4XHPivfBj9
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 3, 2023
जिल्ह्यात भाजपची नेमकी काय परिस्थिती?
सातारा जिल्ह्यात भाजपची नेमकी काय परिस्थिती आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजपसोबत कोण कोण आहे? याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, कराड उत्तर मतदार संघात भाजप चांगले काम करीत आहे. तसेच दक्षिणेत डाॅ. अतुल भोसले यांचा गट आहे. पाटण मतदार संघात मित्रपक्षाचा आमदार आहेत. साताऱ्यात दोन्ही महाराज भाजपकडे आहेत. कोरेगाव मतदार संघात मित्रपक्षाचा आमदार आहे. तर वाई मतदार संघात मदनदादा भोसले भाजपचे आहेत तसेच आ. मकरंद पाटील हे अजित पवार गटाकडे आहेत. त्यामुळे वाई मतदार संघात भाजपाची ताकद मोठी आहे. या सर्व गोष्टीचा विचार केल्यास सातारा लोकसभा मतदार संघात भाजपचाच उमेदवार निवडून येईल यात शंका नाही.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे उद्या बुधवारी सातारा-कराड दौऱ्यावर
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या बुधवारी सातारा जिल्हा व कराड दौऱ्यासाठी येणार आहेत. त्याच्या उपस्थिती अनेक कार्यक्रम पार पडणार आहेत. सकाळी दहा वाजता वाई तालुक्यातील बावधन येथे त्यांचे स्वागत होईल. तेथून ते साताऱ्यात कनिष्क मंगल कार्यालयात येतील. तेथे ३०० पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक होईल. तेथून यशोदा कॅप्मस येथे भेट देतील. सातारा शहरात मोती चौक ते जुना मोटर स्टॅण्ड अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये ते जनतेशी संवाद साधतील. तेथून ते कऱ्हाडला रवाना होतील. कऱ्हाडात त्यांचे जंगी स्वागत होईल. कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण सभागृहात कोअर कमिटीची बैठक होईल. त्यानंतर आझाद चौकापासून ते पायी पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधतील, असे जिल्हाध्यक्ष कदम यांनी यावेळी सांगितले.