सातारा प्रतिनिधी | कोरेगाव- सातारा रस्त्यावर येथील रेल्वे स्टेशनजवळून वाहणाऱ्या वसना नदीच्या पुलावर काल रात्री पावणेदहाच्या सुमारास एसटी बसला समोरून धडक दिल्याने बुलेटस्वार जागीच ठार झाला. गजानन हिरामण जाधव (वय ३५, रा. सस्तेवाडी, वीस फाटा, ता. फलटण) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव-सातारा रस्त्याने कोरेगाव आगाराची सोलापूर- सातारा ही बस (एमएच १४ बीटी ४२०५) साताऱ्याकडे निघालेली होती. ही बस रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास येथील वसना नदीच्या मध्यावर आलेली असताना या बसला समोरून बुलेटवरून (एमएच ४२ डब्लू ३३९९) आलेल्या गजानन हिरामण जाधव (सस्तेवाडी) यांनी जोरदार धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. बुलेटची ही धडक इतकी जोराची होती, की बुलेट धडकल्यामुळे बसच्या पुढील दर्शनी काचा फुटून इतरत्र पडल्या.
बसचे व बुलेटचे मोठे नुकसान झाले. हा अपघात झाल्याचे समजताच कोरेगाव पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत गजानन जाधव यांचा मृतदेह एसटी बसखालून काढून तो विच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
या अपघाताची नोंद रात्री उशिरा येथील पोलिस ठाण्यात झाली असून, अधिक तपास हवालदार अमोल कर्णे करत आहेत. मृत गजानन जाधव यांच्या मागे पत्नी, तीन मुली व इतर असा परिवार आहे.