धनगरवाडीजवळ परप्रांतीय युवकांच्या दुचाकीचा अपघात; 1 ठार तर 1 गंभीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पुणे – बंगळुरू महामार्गावर धनगरवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत (दि. 25) दुपारी दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात अमृत गोहर (वय 24) हा परप्रांतीय युवक जागीच ठार झाला, तर दुचाकी चालवणारा मंगोल भूमीज हा परप्रांतीय युवक गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, केसुर्डी, ता. खंडाळा येथील एका खाजगी कंपनीतील कंत्राटी कामगार अमृत गोहर (वय 24) व मंगोल भूमीज (वय 33, दोघे मूळ रा. पानेरी, उदळगरी, आसाम, सध्या रा. केसुर्डी, ता. खंडाळा) हे दुचाकी (एमएच-11-बीडब्ल्यू-6114) वरून शिरवळकडून केसुर्डीच्या दिशेने (दि. 25) दुपारी निघाले होते. दुचाकी भरधाव असल्याने भूमीज याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले.

त्यामुळे दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकली. हा अपघात एवढा गंभीर होता की, दुचाकी महामार्गावर जवळपास 100 फुटांपर्यंत घसरत गेली. या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेला अमृत गोहर हा जागीच ठार झाला, तर मंगल भूमीज हा गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.

शिरवळ रेस्क्यू टीमच्या सहकार्याने दोघांना शिरवळ ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी अमृत गोहरचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गंभीर जखमी असलेल्या मंगल भूमीज याला पुढील उपचारासाठी पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस उपनिरीक्षक नयना कामथे तपास करत आहेत.