सातारा प्रतिनिधी । सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास आणि उरमोडी येथील पाणीसाठा तीव्र उन्हामुळे खालावल्याने पालिकेने या दोन्ही योजनांवरील पाणीपुरवठ्यात कपात केली होती. सुमारे दोन महिन्यांहून अधिक काळ ही कपात साताऱ्यात सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून शहरासह परिसरात आणि कास तलाव तसेच उरमोडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे येथील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पावसामुळे वाढलेल्या पाणीसाठ्याचा अंदाज घेत पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला.
गेल्या दोन दिवसांपासून अनौपचारिकपणे शहरातील सर्व साठवण टाक्यांमधून पूर्वीसारखाच सर्व प्रभागांना नेहमी इतका पाणीपुरवठा सुरू झाला आहे. कासमधील पाणीसाठ्याने ६१ फुटांची पातळी ओलांडली आहे. यामुळे त्याठिकाणच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. ओसांडणाऱ्या पाण्यामुळे उरमोडीतील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली आहे.
कास परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने आगामी काळात उरमोडीतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. काससह परळी खोऱ्यातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने उरमोडीतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत सद्य:स्थितीत उरमोडीतील पाणीसाठा कमी असला तरी तो समाधानकारक आहे.