सातारा प्रतिनिधी | खंबाटकी घाटात लक्झरी बस लुटायच्या प्रयत्नात असणाऱ्या चौघांना जेरबंद करून दरोड्याचा मोठा डाव भुईंज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने उधळून लावला. संतोष बाळासाहेब चव्हाण, अक्षय दत्तात्रय शितोळे, योगेश आनंदा वाळुंज (सर्व रा. शिंदोडी, ता. शिरुर, जि. पुणे), सिध्दांत यशवंत कांबळे वय ३१ (रा. निमोने, ता. शिरुर जि.पुणे), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. एकजण पळून जाण्यात यशस्वी ठरला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ११ जून रोजी रात्री भुईंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक विशाल भंडारे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार हे हायवेवरून गस्त घालत होते. सपोनि रमेश गर्जे यांना खबऱ्याने माहिती दिली की, वेळे (ता. वाई) गावच्या हद्दीत हायवेच्या पूर्वेकडे झाडीमध्ये पाच लोक मोटरसायकल बाजुला लावून बसले आहेत. ते महामार्गावरुन जाणाऱ्या लक्झरी बस लुटणार आहेत.
सपोनि गर्जे यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, वाईचे डीवायएसपी बाळासाहेब भालचिम, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना माहिती दिली. त्यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार भुईंज गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी- अंमलदार साध्या वेशात घटनास्थळी दाखल झाले. सापळा रचून रात्री साडे आठच्या सुमारास दरोड्याच्या तयारीत अंधारात बसलेल्या संशयीतांना शिताफीने ताब्यात घेतले. एकजण अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला.
पोलिसांनी संशयीतांकडे विचारपूस केली असता, आम्ही पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील असून खंबाटकी घाटामध्ये लक्झरी बस अडवून प्रवाशांचे दागिने, पैसे लुटण्याचा प्लॅन केला होता, अशी कबुली दिली. त्यांची अंगझडती घेतली असता एक सुरा, दोन लोखंडी रॉड, मिरची पुड, मोबाईल तसेच दोन मोटरसायकल, असा एकूण २ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पळून गेलेल्या पाचव्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.