सातारा प्रतिनिधी । राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी केलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे ई पीक पाहणी यादीमध्ये नाव असलेल्या शेतकरी बांधवानी, आपले आधार विषयक संमतीपत्र/ना-हरकत पत्र तयार करावे. आणि संबधित कृषि सहाय्यक्, कृषि पर्यवेक्षक ,मंडल कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे तत्काळ सादर करावे, असे महत्वाचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत राज्यातील सन २०२३ च्या हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२० हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १००० रूपये तर ०.२० हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी ५००० रूपये (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य मंजूर झाले आहे.यासाठी प्रती पिक प्रति शेतकरी कमीत कमी १००० रूपये आणि जास्तीच जास्त १०,००० रूपये मर्यादा ठरवण्यात आली आहे.
तरी ई पीक पाहणी यादीमध्ये नाव असलेल्या शेतकरी बांधवानी मंडल कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे ताबडतोब सादर करावे व अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सातारा या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.