सातारा प्रतिनिधी । डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नैसर्गिक शेतीला चांगला भाव मिळत असल्याने सलग ३ वर्षे नैसर्गिक शेतीविषयी कृषि विभाग शेतक-यांना मार्गदर्शन करून आपल्या शेतीचे सर्टिफिकेशन करणार आहे. अशा प्रमाणित शेतमालाचे उत्कृष्ट पॅकिंग व ब्रँण्डिंग केल्यास त्यास जागतिक बाजरपेठेत चांगला भाव मिळून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती व प्रक्रिया उद्योग करून स्वतःची विक्री व्यवस्था उभी करावी, हाच शेतीसाठी फायदेशीर उपाय असल्याचे मत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी व्यक्त केले.
जावळी येथे कृषी विभागामार्फत कुडाळ येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन सन २०२३ -२४ अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक विकास बंडगर यांनी नैसर्गिक शेती योजनेतील राबवावयाच्या विविध घटकांची माहिती देताना शेतकरी निवड, गटस्थापना, नैसर्गिक शेतमाल शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना, शेतकरी प्रशिक्षण, निविष्ठा उत्पादन व जमिनीचे प्रमाणिकरण व विक्री व्यवस्था निर्माण करणे या विषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रचलित रसायनावर आधारित शेती पद्धतीतील वाढता उत्पादन खर्च, आरोग्यास हानिकारक अन्न निर्मिती व पर्यावरणावर दुष्परिणाम करणाऱ्या शेती ऐवजी नैसर्गिक शेती ही शाश्वत व शेतक-यांना आर्थिक हमी देणारी असेल असा विश्वास बंडगर यांनी यावेळी व्यक्त केला.
डॉ. माधवराव पोळ यांनी योग प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक घेऊन मानवी आरोग्यात सात्विक आहारचे महत्व, शेतीतील रासायनिक खते, कीटकनाशके व तणनाशके यांच्या वापरामुळे विषयुक्त अन्न निर्मितीचे आरोग्यावर व पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम याविषयी सखोल मार्गदर्शन केले. डॉ. संग्राम पाटील यांनी नैसर्गिक शेती मध्ये पिकाच्या पोषणासाठी व जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी आपल्या शेतावर गांडूळ खत, कंपोस्ट खतनिर्मिती व वापर या विषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. कुंभार यांनी नैसर्गिक शेतीमध्ये जैविक खते, किडनाशके, बुरशीनाशके व पिक सबंधंके यांचा वापर व शेतावर त्यांची निर्मिती याविषयी उपस्थित शेटकऱ्याना मार्गदर्शन केले. यावेळी उप विभागीय कृषी अधिकारी वाई प्रशांत शेंडे, तालुका कृषी अधिकारी जावळी तेजदीप ढगे, मंडळ कृषी अधिकारी संजय घोरपडे, कमलाकर नाना भोसले, रवींद्रदादा परामणे तसेच तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होते.