माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील आज शंभूराज देसाईंच्या मतदार संघात, ‘त्या’ ठरावावर भाष्य करणार का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुका दूध उत्पादक सहकारी संघाच्या नामकरणाचा कार्यक्रम आज सोनगाव लुगडेवाडी (ता. पाटण) येथे होत आहे. यानिमित्ताने माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार संघात ऐन निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या कार्यक्रमात शरद पवारांचे शिलेदार काय बोलणार?, याकडे कराड आणि पाटण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुका सहकारी दुध उत्पादक संघ कार्यरत आहे. या दूध संघाचे नामकरण विक्रमसिंह पाटणकर सहकारी दूध संघ, असं केलं जाणार आहे. दुध संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षाची सांगताही होणार आहे. या कार्यक्रमाला माजी सहकारी मंत्री आणि कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सध्या सत्यजितसिंह पाटणकर हे पाटण तालुक्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत.

काही दिवसांपूर्वी लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्या सभेत कराड तालुक्यातील (सुपने जिल्हा परिषद मतदार संघ) सह्याद्रि कारखान्याच्या कार्यक्षेत्रात देसाई कारखान्याचे सभासदत्व देण्याचा ठराव घेण्यात आला. विषय पत्रिकेवरील या विषयामुळे आजी माजी पालकमंत्र्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. देसाई कारखान्याच्या सभेत तो ठराव संमत देखील झाला आहे. या पार्श्वभूमीवर आ. बाळासाहेब पाटील आज पाटणच्या कार्यक्रमात काय बोलतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

सुपने जिल्हा परिषद मतदार संघ हा कराड तालुक्याचा भाग आहे. विधानसभेला हा परिसर पाटण मतदार संघात समाविष्ट असला तरी हा परिसर मूळचा सह्याद्रि कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतो. या भागातील शेतकरी पुर्वीपासून सह्याद्रि कारखान्याचे सभासद आहेत. असे असताना देसाई कारखान्याने सह्याद्रिच्या कार्यक्षेत्रात सभासदत्व देण्याचा ठराव घेतल्यामुळं सुपने जि. प. मतदार संघातील आ. बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांची भूमिका विधानसभा निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे.