कराड प्रतिनिधी | माजी सहकार मंत्री तथा कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्रमात बोलताना खंत व्यक्त केली. “जनता सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या 5 लाखापर्यंतच्या ठेवी परत देण्याचा निर्णय घेऊन ठेवीदारांना सहकार खात्याने दिलासा दिला. 92 टक्के ठेवीदारांना त्याचा लाभ झाला. परंतु, एकही ठेवीदार आपल्याला भेटला नाही,” असे आ. पाटील यांनी म्हटले. तसेच गौरीहर सिंहासने यांनी बँकेची स्थापना केली होती, हे देखील त्यांनी मुद्दाम सांगितले.
जनता बँकेच्या कारभारावर ठेवले बोट
माजी सहकार मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांनी कराड जनता सहकारी बँकेच्या अवसायानासंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले की, बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. सहकार आयुक्त सतत बँकेच्या अर्थिक स्थितीबद्दल माहिती देत होते. परंतु, ठेवीदारांचे पैसे त्यांना मिळावेत, असा माझा प्रयत्न होता. अनेक लोक मला भेटून ठेवीदारांचे नुकसान होऊ नये, असे सांगत होते. त्यादृष्टीने आपण सहकार आयुक्तांना ठेवीदारांच्या हिताचे रक्षण झाले पाहिजे, अशी सूचना करून निर्णय घेण्यास सांगितले. त्यानंतर बँक अवसायानात निघाल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, ठेवीदारांना 5 लाखांपर्यंतच्या ठेवी परत देण्याचाही निर्णय आम्ही घेतला. परंतु, एकही ठेवीदार मला येऊन भेटला नाही, अशी खंत देखील आमदार पाटील यांनी व्यक्त करून दाखवली.
… तर संस्था अडचणीत येते
अर्थिक संस्था चालवताना सभासद, ठेवीदारांच्या हिताचा विचार करावा लागतो. संस्थेच्या अनेक शाखा काढल्या जातात. परंतु, त्यातील एखादी शाखा अडचणीत आली तर लोक ठेवी काढायला लागतात. त्यामुळे संपूर्ण संस्थाच अडचणीत येते. त्यामुळे ठेवी, कर्ज वाटप, वसुली याचा योग्य ताळमेळ घालून संस्थेचा कारभार करावा लागतो. विश्वस्तांना सभासद ठेवीदारांचा विश्वास संपादन करावा लागतो. तेव्हाच संस्थेची प्रगती वेगाने होते, असे आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले.
कालिकादेवी पतसंस्थेच्या प्रगतीचे केले कौतुक
श्री कालिकादेवी पतसंस्थेला तीन तप पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या संस्थेच्या प्रवर्तक आणि आजी-माजी पदाधिकार्यांच्या सत्कारप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, अनेक सहकारी संस्था डबघाईला येत असताना श्री कालिकादेवी पतसंस्थेने सचोटीने कारभार करत सहकारातील आपले स्थान बळकट केले आहे. कार्यक्रमाला झालेली गर्दी ही संस्था आणि विश्वस्तांवरील विश्वास दर्शवते. अर्थकारणाबरोबरच सामाजिक भानही जपत आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने पुरस्कार देऊन समाजातील चांगल्या कामाचे कौतुक करत आहे.