अजित पवारांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध; शरद पवार गटातील ‘या’ माजी मंत्र्याच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

0
7
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील मतदारांनी मला २५ वर्षे विधीमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. या काळात काँग्रेस, एकनाथ शिंदे असतील किंवा राष्ट्रवादीचे अजित पवार असतील या सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेऊन काम करण्याची माझी भूमिका राहिली असल्याचे वक्तव्य माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी नुकतेच केले आहे. त्यांच्या या वक्तव्यातून त्यांनी आपल्या विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. परंतु, शरद पवार (Sharad Pawar) गट अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीत जाणार का?, या चर्चेला सुद्धा अधिकच जोर आला आहे.

‘कभी नाव गाडी पे तो कभी गाडी नाव पे’

राज्यातील सर्वच पक्षांशी, नेत्यांशी व्यक्तिशः माझे चांगल्या प्रकारचे संबंध आहेत, असं सांगून माजी मंत्री बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, यशवंतरावांचा विचार सोडायचा नाही, ही आपली भूमिका आहे. आज आपल्याला काळ उलटा लागला असला तरी ‘कभी नाव गाडी पे तो कभी गाडी नाव पे’, असं होत राहतं. विधानसभेचा निकाल आपण स्वीकारला आहे. एवढं बहुमत कसं? बहुमत मिळूनही जल्लोष का नाही? अशी चर्चाही झाली. परंतु, निकालादिवशी मी अर्ध्या तासातच जनमताचा कौल स्वीकारला होता, असंही त्यांनी सांगितलं.

‘सहकारा’वर विश्वास ठेऊन ‘सहकार्य’ करा

आपण नियमानं काम करतो. त्यामुळं शासकीय पातळीवर काही अडचणी येतील, अशी परिस्थिती नाही, असंही माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलं. तसंच सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेऊन काम करण्याची आपली भूमिका राहिलेली आहे. कारखान्याच्या माध्यमातून पुढील पन्नास वर्षांत सर्वांच्या जीवनात अर्थिक परिवर्तन घडेल. आपण सर्वांनी सहकारावर विश्वास ठेऊन सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं.

शेअर्सची साखर मोफत गाव पोहोच देणार

गेली पन्नास वर्षे सभासदांनी कारखान्याच्या प्रगतीमध्ये सहकार्य केलंय. त्यांना काही तरी दिलं पाहिजे, असं आम्हाला वाटत होतं. म्हणून १ एप्रिल २०२७ पासून सभासदांना शेअर्सची साखर मोफत गाव पोहोच देण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतला असल्याचं माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जाहीर केलं. तसेच आधी ३२०० रूपये पहिली उचल जाहीर केली होती. मात्र, त्यामध्ये ४ रूपयांची वाढ करून ३२०४ रूपये पहिली उचल सभासदांच्या खात्यावर वर्ग केली असल्याचं सांगितलं. संचालक मंडळ, नेते आणि कार्यकर्ते तुमच्या सेवेशी बांधिल आहेत, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

खोट्या नरेटीव्हला बळी पडू नका

हल्ली राजकारणात खोटं नरेटीव्ह पसरवण्याची नवीन भानगड सुरू झाली आहे. ऊस तोडणी टोळ्यांच्या बाबतीत सभासदांमध्ये खोटं नरेटीव्ह पसरवलं जात आहे. त्या अपप्रचाराच्या मुळाशी आपण जायला पाहिजे. कुणाचं तरी भलं व्हावं, कुणाला तरी ऊस मिळावा, यासाठी असं बोललं जातंय. त्या अपप्रचाराला बळी पडू नका. राजकीय नरेटीव्हला प्रत्त्युत्तर द्यायला मी सक्षम आहे, असा इशाराही माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी विरोधकांना दिला.