पोलिसांनी घरफोडीतील चोरट्याला ठोकल्या बेड्या; 6.40 लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील चोराडे येथे साडे तीन महिन्यांपूर्वी अज्ञात चोरट्याने महालक्ष्मी सव्हिसिंग सेंटरमध्ये प्रवेश करत ६ लाख १० हजार रुपये किमतीचे साऊंडी सिस्टीम, स्पीकर, एम्पीफायर असे साहित्य चोरून नेले होते. या चोरीचा छडा लावण्यात औंध पोलिसांना यश आले असून त्यांनी चोरट्यास अटक करत त्याच्याकडून मुद्देमाल व दुचाकी असा एकूण ६ लाख ४० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

शुभम रमेश मोहिते (वय ३०, रा तोंडोली, ता. कडेगाव, जि सांगली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. २१/ १०/ २०२३ रोजी सायंकाळी ६ ते दि. २२/१०/२०२३ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी खटाव तालुक्यातील चोराडे येथील महालक्ष्मी सव्हिसिंग सेंटरमधील पत्र्याचे स्क्रू काढून आतमध्ये प्रवेश करुन ६ लाख १० हजार रुपये किमतीचे साऊंडी सिस्टीम, स्पीकर, एम्पीफायर असे साहित्य चोरून नेले होते. या चोरीच्या घटनेवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध नोंद औंध पोलीस ठाणे गु.र.नं.२८०/२०२३ भादविक ३८०, ४६१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पोलिस अधीक्षक श्री. समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपींबाबत माहिती प्राप्त करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली तपास पथक तयार करुन त्यांना नमुद गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले.

सदरचे तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन तेथील तसेच आजूबाजूचे साक्षीदार यांच्याकडे विचारपूस करुन तसेच तांत्रिक विश्लेषनाचे आधारे आरोपींबाबत माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला परंतू काही मिळून आली नाही. दि.१४/०१/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली की, सदरचा गुन्हा तोंडोली ता. कडेगाव जि. सांगली येथील एका इसमाने केला आहे.

प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी तपास पथकास नमुद इसमास ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तपास पथकाने तोंडोली ता. कडेगाव जि.सांगली येथे जावून त्यास ताब्यात घेवून नमुद गुन्हयाचे अनुशंगाने त्याचेकडे विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले. चोरी केलेले साहित्य ऊसाचे शेतामधून काढून दिल्याने गुन्हयात चोरीस गेलेला ६ लाख १० हजार रुपयेचा सर्व मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केला. तसेच गुन्हयात वापरलेली ३० हजार रुपये किमतीची मोटार सायकल देखील हस्तगत करण्यात आलेली आहे.

पोलिस अधीक्षक श्री. समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, मंगेश महाडीक, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, हसन तडवी, सनी आवटे, अमोल माने, मुनीर मुल्ला, अमित झेंडे, राजू कांबळे, शिवाजी भिसे, मनोज जाधव, प्रविण कांबळे, धीरज महाडीक, स्वप्नील दौंड, मोहसिन मोमीन, अमृत कर्पे, दलजित जगदाळे, विजय निकम यांनी सदरची कारवाई केली. कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलिस अधीक्षक श्री. समीर शेख व श्रीमती आँचल दलाल यांनी अभिनंदन केले.