सातारा प्रतिनिधी । राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघात तर अटीतटीची लढत पहायला मिळणार आहे. निवडणुकीच्या आखाड्यात कुणाचा पती, कुणाचे वडील तर कुणाची बायको उतरली असल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून प्रचारात हजेरी लावत मतदार बांधवांना मतदार करण्याचे आवाहन केले जात आहे. तर कुणाची मुलगी सकाळी सकाळी भाजी मंडईत जाऊन भाजी विक्रेत्यांशी संवाद साधत असल्याचे सातारा जिल्ह्यात दिसत आहे.
जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांतील विद्यमान आमदारांच्या पत्नीही प्रचारात सहभागी झाल्या आहेत. त्यासोबतच या आमदारांच्या विरोधात उभे असलेल्या भावी आमदारांच्या पत्नींनी देखील प्रचारात उडी घेतली आहे. महिलांची रॅली, मेळावे, हळदी- कुंकू आदींच्या माध्यमातून सौभाग्यवती आपल्या पतीचा प्रचार करत आहेत. याशिवाय वैशाली शशिकांत शिंदे, स्मितादेवी शंभूराज देसाई यांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यासोबतच आमदारांविरोधात रिंगणात उतरलेल्या भावी आमदारांच्या पत्नीही प्रचारात सहभागी झाल्या आहेत.
माण खटाव मत संघात इंदिरा प्रभाकर घार्गे, पाटणला धनश्री हर्षद कदम, यशस्विनी सत्यजित पाटणकर, कराड उत्तरमध्ये ममता मनोज घोरपडे तर वाई- खंडाळ्यात निशा पुरुषोत्तम जाधव यांचा प्रचारात समावेश आहे. या सौभाग्यवतींनी आपल्या पतीच्या विजयासाठी पदर खोचला असून, सध्या त्यांच्या प्रचारातील सहभागामुळे निवडणुकीत वेगळाच रंग भरला आहे. काही मतदारसंघांत महिलांचे भव्य मेळावेही या सौभाग्यवती घेत आहेत. कोणती सौभाग्यवती आपल्या पतीला आमदार करण्यात यशस्वी होतेय, याची उत्सुकता जिल्ह्यात आहे.
कराड दक्षिणेत दोन्ही बाबांच्या पत्नी प्रचारात सहभागी
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात भाजप महायुतीकडून डॉ. अतुलबाबा भोसले यांनी निवडणुकीच्या रिंगणात दंड थोपटले आहेत. तर काँग्रेस महाविकास आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण आहेत. यावेळेस दोघांच्यामध्ये अटीतटीची लढत होणार आहे. डॉ. अतुल भोसले हे देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील. साखर कारखाने, हॉस्पिटल, बँका, शाळा- कॉलेजेस या माध्यमातून भोसले कुटुंब थेट जनतेशी कनेक्टेड आहे. त्यामुळे यंदाही कराड दक्षिणेत काटे कि टक्कर होणार हे नक्की. डॉ. अतुल भोसलेंच्या प्रचारासाठी त्यांचे वडील डॉ. सुरेश भोसले, पत्नी गौरवी अतुल भोसले (Gauravi Atul Bhosale) यांच्यासह कुटुंबीकडून प्रचार केला जात आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचासाठी पत्नी सत्वशीलादेवी पृथ्वीराज चव्हाण या महिलांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत.
शिवेंद्रराजेंच्या प्रचारासाठी कन्या मृणालीराजे भाजी मंडईत
विधानसभा निवडणुकीत साताऱ्यात भाजपने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना उमेदवारी दिलीय. तर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने अमित कदम यांना तिकीट दिले आहे. आता प्रचाराला जोरदार सुरुवात झालीय. भाजपचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रचारासाठी त्यांची लेक मृणालीराजे मैदानात उतरल्या आहेत. मृणालिनीराजे या साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले यांचा प्रचार करताना दिसून आल्या. भाजी मंडईत जाऊन त्यांनी लोकांशी संवाद साधला. मृणालीराजे पहिल्यांदाच प्रचारासाठी किंवा राजकीय कार्यक्रमात दिसल्यानं आता छत्रपती घराण्यातली चौथी पिढी राजकारणात उतरल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे. शिवाय शिवेंद्रराजे यांच्या पत्नी वेदांतिकाराजे शिवेंद्रसिंहराजे भोसले या देखील प्रचारात उतरल्या आहेत.
वाईत मकरंद आबांसाठी पत्नी तर अरुणादेवींसाठी पती प्रचारात
वाई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार अरुणादेवी शशिकांत पिसाळ या निवडणूक रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात अजित पवार गटाचे नेते मकरंद आबा पाटील हे उभे आहेत. दोघांचाही प्रचार धडाकेबाजपणे सुरू आहे. अरुणादेवी यांच्या प्रचारासाठी पती शशिकांत पिसाळ हे मैदानात उतरले आहेत. गावोगावी भेटी, मेळावे, कोपरा सभा, पदयात्रांच्या माध्यमातून त्यांनी पत्नीच्या विजयासाठी प्रचारात आघाडी घेतली आहे. तर मकरंद आबांच्या प्रचारासाठी अर्चना मकरंद पाटील या देखील प्रचारात उतरल्या आहेत.
पाटणला वडिलांसाठी सुपुत्र प्रचारात तर माणला जयकुमार गोरेंसाठी पत्नीकडून प्रचार
पाटण विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी त्यांचे सुपुत्र यशराज देसाई (दादा) देखील प्रचारात हजेरी लावत आहेत. माण खटाव विधानसभा मतदारसंघात देखील अशीच चर्चा आहे. या विधानसभा मतदार संघात भाजपकडून राजकारणातील डावपेच खेळण्यात पैलवान समजल्या जाणाऱ्या आमदार जयकुमार गोरे यांनी दंड थोपटले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी सोनिया जयकुमार गोरे या देखील उतरल्या आहेत. त्यांच्याकडून देखील महिलांमध्ये प्रचार केला जात आहे.