कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाच्या अतिरिक्त कामास मंजुरी; आता अधिक वीजनिर्मिती होणार

0
428
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर) या जलविद्युत प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देतानाच ८६२ कोटी २९ लाख रुपयांची तरतूद करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यासाठी या पायथा विद्युतगहाचे नियोजन करण्यात आले आहे. यातून एकूण ८० मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे.

सुधारित मान्यतेमुळे प्रकल्पाच्या बांधकामाचे काम हाती घेण्यास परवानगी मिळाली आहे. हा प्रकल्प धरणाच्या पायथ्याशी उभारला जाऊन डाव्या तीरावर वीजनिर्मिती केली जाणार आहे. कोयना धरणाच्या मूळ नियोजनात पूर्वेकडील सिंचनासाठी ३० टीएमसी, तर कृष्णा खोरे महामंडळांतर्गत समाविष्ट विविध उपसा सिंचन योजनांसाठी अतिरिक्त २० टीएमसी पाणी देताना त्यातून कमाल मागणीच्या कालावधीत अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.

तसेच धरण पायथ्याची वीजगृहे या कालावधीत रूपांतरित करण्यासाठी कोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर) या योजनेचे नियोजन केले आहे. मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. २०२३ मध्ये शासनाने सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे उदंचन जलविद्युत प्रकल्प, सौर आणि इतर अपारंपरिक संकरित प्रकल्पांच्या विकासाचे धोरण निश्चित केले होते. त्यानुसार आता हा प्रकल्प कृष्णा खोरे महामंडळ व महानिर्मिती कंपनी यांच्या संयुक्त . विद्यमाने विकसित करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे.

या जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी आवश्यक एकूण १३३६ कोटी ८८ लाख रुपयापैकी ८६२ कोटी २९ लाख रुपयांच्या तरतुदीस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. उर्वरित खर्चाची तरतूद सिंचन योजनांवर टाकण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे टेंभू, कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना या योजनांसाठी २० टीएमसी पाणी वीज निर्मितीनंतर सोडणार आहे. यात एकूण २७७.८२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती होणार आहे.