सातारा प्रतिनिधी । नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असे दोन गट बारामती लोकसभा मतदार संघात पहायला मिळाले. या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात भडक आणि बेधकड बोलणाऱ्या उत्तम जानकर यांना शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी दिली आहे. उत्तम जानकर यांना पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील माण-खटाव आणि सोलापुर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघाकरिता विशेष निरीक्षक पदी निुयक्त करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षतील नेत्यांवर काही जबाबदाऱ्या देण्यास सुरुवात केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणजे उत्तमराव जानकर यांची माण-खटाव सातारा व मोहोळ सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या विशेष निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडीच्या पात्रात नेमकं काय म्हटलं आहे?
उत्तम जाणकार यांच्या निवडीचे पक्षातर्फे तसे पत्रकही जारी करण्यात आले आहे. यातच आपण आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दष्टीने माजी आमदार बाळासाहेब पाटील, सातारा जिल्हा प्रभारी व खासदार धैर्यशील मोहिते पाटील, शेखर माने, सोलापुर जिल्हा निरीक्षक यांचेशी समन्वय साधून पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करावी. तसेच विधानसभा निवडणुकीत मोठे यश प्राप्त करून देऊन सर्वशक्तीनिशी योगदान द्यावे, असे पत्रात म्हटलं आहे.
फडणवीसांनीही जानकरांना आपलंस करण्याचा केला होता प्रयत्न
उत्तमराव जानकर हे माढा लोकसभा मतदारसंघावर परिणाम करणारे माळशिरस येथील धनगर समाजाचे महत्वाचे नेते आहेत. माढा लोकसभेत उत्तम जानकरांचा पाठिंबा कोणाला यावर जय-पराजयाचे गणित अवलंबून असते, असे म्हटले जाते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकरांसोबत बोलणी करण्याचा प्रयत्न केला होता. फडणवीसांनी त्यांच्यासाठी विशेष विमान पाठवून त्यांना नागपुरला बोलावून घेतले होते. मात्र, ही सर्व शिष्टाई निष्फळ ठरली होती.
अजितदादांची साथ सोडल्यानंतर पवार साहेबांसोबत पाळली एकनिष्ठता
अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर उत्तम जानकर हे शरद पवारांसोबत राहिले. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. तीन दशकांपासूनचे मोहिते पाटील जानकर यांचे वैर या निवडणुकीत संपलेले दिसले आणि जानकरांनी धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करण्याचा जणू विडाच उचलला होता. उत्तम जानकर यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर माळशिरस विधानसभा लढवली होती. त्यावेळी त्यांनी भाजप उमेदवार राम सातपूतेंवर बनावट नोटा वाटल्याचा आरोप केला होता. यंदाही ते माळशिरसमधून भाजपला तगडे आव्हान देण्याची शक्यता आहे. त्याआधी शरद पवारांनी त्यांच्यावर दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे.