कराड प्रतिनिधी । पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा येथील कणसे ढाब्यासमोर अज्ञात वाहनाने एका दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील रघुनाथ विठ्ठल मोपरे (वय 31, रा. शिरवळ, ता. खंडाळा) हा तरुण ठार झाला. हि अपघाताची घटना सोमवारी घडली असून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ येथील रघुनाथ मोपरे हा दुचाकीवरून साताऱ्याकडून शिरवळकडे निघाला होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्याला जाेरदार धडक दिली. त्यानंतर संबंधित वाहनचालक तेथून वाहन घेऊन पसार झाला. या अपघातात रघुनाथ मोपरे हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर भरत विठ्ठल मोपरे (वय 35, रा. शिरवळ, ता. खंडाळा) यांनी पोलिसांत अज्ञात वाहनधारकाच्या विरोधात तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी अज्ञात चारचाकी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून हवालदार कारळे हे अधिक तपास करीत आहेत.