सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे एसटी स्टँड समोर असणाऱ्या पुलावर रिक्षा उलटून कोरेगाव तालुक्यातील बोरीव गावातील एक वृद्ध जागीच ठार झाला. तर एकजण जखमी झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
वसंत हरिभाऊ पोळ (वय ६५, रा. बोरीव पोस्ट रहिमतपूर, ता. कोरेगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रिक्षा चालक नवनाथ पोळ हे वडील आजारी असल्याने कुटूंबियांसमवेत रिक्षा क्रं. (MH-43-BC-8385) मधून कोरेगाव बाजूकडे येत होते. दरम्यान, शिरवळ गावच्या हद्दीत नवनाथ यांचे रिक्षावरील नियंत्रण सुटून रिक्षा महामार्गावरील संरक्षक कठड्याला धडकून रिक्षा उलटली. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ शिरवळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी व शिरवळ रेस्क्यू टिमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, वसंत पोळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जखमी सुनेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत वसंत पोळ यांचे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली आहे. याबाबत प्रीती पोळ यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक नयना कामथे हे अधिक तपास करीत आहे.