जावळीतील शेतकरी दांपत्यावर रान डुक्कराचा हल्ला; वृद्ध महिला जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । जावली तालुक्यातील म्हाते खुर्द गावातील तुकाराम सावळा दळवी आणि त्यांच्या पत्नी शेवंताबाई दळवी या दाम्पत्यावर शेतामधून घरी येत असताना रान डुक्कराने हल्ला केला. त्यात शेवंताबाई जखमी झाल्या तर त्यांचे पती थोडक्यात बचावल्याची घटना मंगळवारी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील म्हाते खुर्द तेथील शेतकरी दाम्पत्य शेवंताबाई दळवी आणि तुकाराम दळवी हे राहतात. ते मंगळवारी आपल्या शेतामधून घरी परतत असताना सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास दोघांवर रान डुक्कराने अचानक हल्ला केला. शेताजवळील गावच्या मुख्य रस्त्यावरच रान डुक्कराने अचानक हल्ला केल्याने तुकाराम दळवी व शेवंताबाई दळवी यांनी धाडसाने आपल्या हातातील काठीने त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. मात्र, तोपर्यंत शेवंताबाई यांना रान डुक्कराने जखमी केले. त्यानंतर तो शेताच्या दिशेने पळून गेला. यावेळी दाम्पत्याचा आरडाओरडा ऐकून स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

म्हाते खुर्दचे सामाजिक कार्यकर्ते अनिल भिलारे यांनी जखमी शेवंताबाई यांना तात्काळ मेढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर तसेच आरोग्य सेविका हजर नसल्यामुळे त्यांना अखासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जावळी तालुक्याच्या दक्षिण विभागातील म्हाते खुर्द येथे भरदिवसा रानटी जनावरांचा वावर आढळून येत असल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने रानटी जनावरांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.