सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यामध्ये बिबट्याचा वावर सध्या वाढला असून त्याच्याकडून अनेक वन्य प्राणी, पाळीव जनावरांवर हल्ले केले जात आहेत. मात्र, हल्ला करताना बिबट्याचा जीव देखील गेल्याच्या घटना घडल्या देखील आहे. अशीच घटना सातारा तालुक्यात घडली आहे. वानराच्या पिल्लाचा शिकार करायला गेलेल्या बिबट्याला विजेचा धक्का लागल्यामुळे वानर आणि बिबट्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला असल्याची घटना सातारा तालुक्यातील आसनगावजवळच्या राकुसलेवाडीत आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेनंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा तालुक्यातील आसनगाव येथील राकुसलेवाडी गावामध्ये मृत अवस्थेत बिबट्या आणि वानराचे पिल्लू आढळून आले. लाइटच्या डीपी शेजारी दोघेही मृतावस्थेत आढळून आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली.
ज्यावेळी बिबट्या वानराच्या पिल्लाची शिकार करायला गेला. त्यावेळी वानराने लाइटच्या पोलवर उडी मारली असावी आणि डीपीला स्पर्श झाल्यामुळे त्याला शॉक लागला असावा अशामध्ये शॉक लागून दोघांचीही जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून दोघांचेही मृतदेह त्यांनी ताब्यात घेतले आहेत.