सातारा प्रतिनिधी । सातारा येथे एका १६ वर्षांच्या शाळकरी मुलीचा १७ वर्षीय तरुणाकडून पाठलाग करत “तू मला खूप आवडतेस, मला तुझ्याशी बोलायचंय,” असं म्हणून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात असून याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात एका १७ वर्षीय तरुणावर विनयभंगसह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी १६ वर्षांची असून, १७ वर्षीय तरुण हा त्या मुलीच्या शाळेजवळ जायचा. त्या ठिकाणी उभे राहून ती जेव्हा शाळा सुटल्यावर चालत जायची तेव्हा तिच्याकडे जाऊन ‘मला तुझ्याशी बोलायचे आहे. तू मला खूप आवडतेस,’ असे म्हणून तिचा वारंवार विनयभंग करत होता. तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने तो तिच्याशी जवळीक करता यावी, यासाठी तिच्या घरापर्यंत वारंवार पाठलाग करत असे.
संबंधित तरुणाकडून दिल्या जात असलेल्या वारंवार त्रासामुळे हा प्रकार मुलीने आपल्या घरी सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने संबंधित तरुणाला समजावून देखील सांगितले. मात्र, तरी सुद्धा तो मुलीला घराजवळ थांबवून बोलण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार सुद्धा मुलीने घरी सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने दि. १७ रोजी रात्री साडेनऊ वाजता शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक सतीश साबळे हे अधिक तपास करीत आहेत.