प्रेमसंबंधाच्या संशयावरुन युवकावर ‘त्यानं’ केला कोयत्याने सपासप वार; एकावर गुन्हा दाखल, हल्ल्यात युवक गंभीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड शहरात किरकोळ कारणावरून थेट धारदार शस्त्राने हल्ला करण्याच्या घटना अधून मधून घडत आहेत. अशात कोयत्याने वार करुन युवकाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना कराड शहरातील ऊर्दु शाळेमागे दरवेशी गल्लीत गुरूवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सद्दाम हुसेन शेख असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर कोयत्याने केलेल्या हल्ल्यात रवी हणमंत पुजारी हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत शारदा हणमंत पुजारी (रा. दरवेशी गल्ली, कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड शहरातील दरवेशी गल्लीत राहणाऱ्या रवी पुजारी याचे एका युवतीशी प्रेमसंबंध आहेत, असा संशय सद्दाम शेख याला आला.

या संशयावरुन गुरूवारी रात्री तो रवी याच्या घरी गेला. तुझ्याकडे काम आहे, तु माझ्यासोबत चल, असे म्हणून तो त्याला त्याच्या घरापासून थोड्या अंतरावर घेवून गेला. त्याठिकाणी शिविगाळ, दमदाटी करीत तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणून सद्दाम शेख याने त्याच्याजवळील कोयत्याने रवी पुजारी याच्यावर हल्ला केला. त्यामध्ये रवी गंभीर जखमी झाला.

घटना निदर्शनास येताच परिसरातील नागरीकांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी जखमी रवी पुजारी याला रुग्णालयात दाखल केले. याबाबत शारदा पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.