पोलिसांची तपासणी सुरु असल्याचे सांगत दोघांनी वृद्धाचे 3 तोळ्यांचे दागिने केले लंपास

0
25
Shahupuri Police Station Satara
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अज्ञात चोरट्यांच्या टोळीकडून अनेकांना अनेक कारणांनी गंडा घातला जात आहे. दरम्यान, अशी एक घटना साताऱ्यात घडली. ‘पुढे चाैगुले साहेबांच्या भावावर चाकूने वार झालेत, पोलिसांची तपासणी सुरू आहे,’ असे सांगून दोघा भामट्यांनी एका वृद्धाकडून तीन तोळ्यांचे दागिने हातोहात काढून घेतली. या दागिन्यांची किंमत सुमारे दीड लाख रुपये होती. ही घटना दि. ४ रोजी सायंकाळी पावणेपाच वाजता मंगळवार तळ्याजवळ घडली. दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा येथील मोरे काॅलनी, व्यंकटपुरा पेठेत शिवाजी सीताराम वास्के हे ७८ वर्षीय सेवानिवृत्त वृद्ध राहतात. सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास ते मंगळवार तळ्याजवळून चालत निघाले होते. त्यावेळी तेथे दोन युवक त्यांच्या जवळ आले. ‘तुम्ही पुढे जाऊ नका, चाैगुले यांच्या भावावर चाकूने वार झालेत. दागिने तुम्हाला कागदाच्या पुडीत व्यवस्थित बांधून देतो,’ असे सांगितले. त्यानंतर वास्के यांनी एक तोळे वजनाची सोन्याची अंगठी तसेच दोन तोळ्यांची चेन काढून दिली.

हे दागिने पुडीत बांधत असल्याची हातचलाखी करून चोरट्यांनी स्वत:जवळ काढून घेतले. मात्र, पुडीमध्ये दोन दगडाचे खडे बांधून पुडी त्यांच्याकडे दिली. काही अंतर पुढे गेल्यानंतर वास्के यांनी पुडी उघडली असता त्यामध्ये दोन खडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकारानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक फाैजदार एस. एम. गायकवाड हे अधिक तपास करीत आहेत.