सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही दुष्काळाचा फटका बसलेला आहे. कारण म्हणजे गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले आहे. त्याचा परिणाम आता रब्बी पेरणीवर झाला आहे. जिल्ह्यात फक्त 81 टक्के पेरणी झालेली असून सुमारे 40 हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना राहिलेले आहे. विशेष म्हणजे ज्वारीसह गव्हाच्या क्षेत्रात मोठी घट झालेली आहे.
सातारा जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यास दोन हंगाम चांगल्यारितीने शेतकऱ्याकडून घेतले जातात. या हंगामातील सर्वात मोठा हंगाम हा खरिपाचा समजला जातो. त्यानंतर रब्बी हंगाम घेतला जातो. मात्र, गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. सरासरीच्या 65 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला होता. यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पेरणीवर परिणाम झाला. तसेच उत्पादनावरही परिणाम झाला आहे. जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे 2 लाख 13 हजार हेक्टरवर निश्चित करण्यात आले होते.
यामध्ये ज्वारीचे सर्वाधिक 1 लाख 35 हजार हेक्टर क्षेत्र होते. त्यानंतर गव्हाचे 37 हजार हेक्टर, हरभरा 27 हजार हेक्टरवर होते. या तीन प्रमुख पिकांशिवाय मका, करडई, सूर्यफूल, तीळ, जवस घेणारे शेतकरी आहेत. पण, या पिकांचे क्षेत्र अत्यल्प आहे. जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने रब्बीच्या पेरणीवरही परिणाम झाला आहे. कृषी विभागाच्या अंतिम पेरणी अहवालानुसार 81.12 टक्केच पेरणी झालेली आहे. त्यामुळे 1 लाख 72 हजार 950 हेक्टरवरच पेरणी झालेली आहे. यामध्ये प्रमुख पीक असणाऱ्या ज्वारीची 1 लाख 3 हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. 76 टक्क्यांवर ही पेरणी आहे. तर गव्हाची सुमारे 33 हजार हेक्टरवर पेर आहे. पेरणीची टक्केवारी 88 इतकी आहे. हरभऱ्याची 77 टक्के क्षेत्रावर पेर आहे. म्हणजे, 21 हजार 339 हेक्टरवर पेरणी झालेली आहे.
कृषी विभागाने 10 हजार हेक्टर क्षेत्र निश्चित केले होते. प्रत्यक्षात 14 हजार हेक्टरवर मका घेण्यात आलेली आहे. मक्याची पेरणी टक्केवारी १३८ इतकी आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाले. त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता नाही. दुष्काळी स्थिती असल्याने शेतकऱ्यांनी पाणी उपलब्धततेचा विचार करुन रब्बी हंगाम पेरणी केलेली आहे. तसेच पेरणी होऊनही पिकांना पाणी कमी पडत असल्याने पीक उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.