कराड प्रतिनिधी । कराड – चिपळूण रस्त्याच्या नित्कृष्ट दर्जाच्या कामाबाबत मंगळवारी पठण तालुक्यातील संगमनगर ( धक्का ) येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने रास्ता रोको करत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी कराड-चिपळूण रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये भात रोपे लावून शासनाचा निषेध नोंदवला.
यावेळी पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ. स्नेहल जाधव, माजी प. सं.सदस्य बबनराव कांबळे, बाळासाहेब कदम, सत्यजित शेलार, पंकज गुरव, संपत जाधव, अश्फाक शेख, सुरज पंधारे, कोयना विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पं.स.सदस्य बबन कांबळे म्हणाले, कराड – चिपळूण रस्त्याचे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे झाले असून या रस्त्यावर शेकडो खड्डे पडलेले आहेत. या पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक करताना नागरिकांना नाहक त्रास होत आहे. पावसामुळे या खड्ड्यांची आणखीनच दुरावस्था झाली असून या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले की वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने गेल्या काही दिवसांत अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या अपघातांमुळे आतापर्यंत अनेक जण जखमी झाले आहेत तर काही मृत्यू पावले आहेत.
कराड – चिपळूण रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये लावली चक्क भात रोपे; पाटणला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा आंदोलनातून निषेध pic.twitter.com/mFupF8AC4s
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) August 8, 2023
यापुढेही अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागू शकतो. खराब रस्त्यांमुळे वाहनांचा देखभाल खर्च देखील वाढत आहे. प्रशासनाकडे या समस्येबाबत वेळोवेळी निवेदन देऊन तसेच तक्रार करुनही कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आता तरी याची दखल घेऊन लवकरात लवकर या रस्त्यावरील खड्डे प्रशासनाच्या वतीने भरले जावेत अशी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करीत आहोत.
या रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधींचा निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु या रस्त्याचे काम अतिशय नित्कृष्ट दर्जाचे झाले असून सर्वसामान्यांचा हा पैसा कोणाच्या खिशात गेला आहे याची चौकशी झाली पाहिजे. सरकारी अधिकाऱ्यांनीही फक्त उडवाउडवीची उत्तरे न देता लोकांच्या समस्या समजून घेऊन लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा येणाऱ्या १५ दिवसांत यापेक्षाही तीव्र आंदोलन करून कराड चिपळूण रस्त्याची वाहतूक बंद पाडण्यात येईल, असा इशारा यावेळी बाळासाहेब कदम यांनी दिला.
यावेळी आंदोलकांनी सुमारे पाऊणतास कराड – चिपळूण रस्त्याची वाहतूक रोखून धरली होती. यावेळी महसूल, बांधकाम, पोलिस आदी विभागातील अधिकाऱ्यांनी संबंधित रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले.