सातारा प्रतिनिधी | कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रामध्ये फलटण तालुका अग्रेसर असून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतीचे उत्पादन वाढविणे व आर्थिक उन्नती साधने सहज शक्य आहे, यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेतकऱ्यांच्या सतत पाठीशी आहे.असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी केले.
शेरेचीवाडी(ढवळ) ता. फलटण येथे हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांच्या शेती शाळेचे आयोजन महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत करण्यात आले होते याप्रसंगी ऊपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी गायकवाड म्हणाले की, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये अधिकाधीक शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन अन्न प्रक्रिया उद्योगांची उभारणी करून स्वतः उद्योजक बनावे.शेती विषयक कामांमधील कौशल्य वाढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेती शाळांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत आहे.शेती शाळांच्या माध्यमातून राबविलेल्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिका वर आधारित क्षेत्रीय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शेतकरी त्या त्या पिकातील तज्ञ बनत असून एकात्मिक पीक व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन या गोष्टींचा अवलंब केल्याने शेती उत्पादनामध्ये वाढ होत आहे.यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या शेती शाळांमध्ये आपला सहभाग वाढवावा.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच सौ. दुर्गादेवी रविंद्र नलावडे ह्या होत्या.याप्रसंगी ग्रा.पं. सदस्य राणी महेश चव्हाण, ग्रामसंघ सचिव शोभा शिंदे,प्रगतीशील शेतकरी संजय मोहिते, दत्तात्रय नलवडे, चिन्मय घाडगे,सिताराम चव्हाण, मनोहर मोहिते, महेश चव्हाण, सिमा शिदे, दिपाली शिंदे, उज्वला शिंदे, निर्मला मोहिते आदि उपस्थीत होते.
मंडळ कृषि अधिकारी तरडगाव, पुजा दुदुस्कर यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती देताना प्रधानमंत्री हवामान आधारीत पीक विमा योजना,राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत बांधावर तसेच सलग फळबाग व बांबू लागवड, प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजना, कृषि यांत्रिकीकरण योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास योजना,फळपीक विमा आदि योजना मध्ये सहभाग नोंदवावा असे सांगितले.
जिल्हा संसाधन व्यक्ती सौ.सुनिता सावंत यांनी प्रधान मंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग योजने विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी गावातील महिला उद्योजिका व प्रगतीशील शेतकरी यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मंडळ कृषि अधिकारी सतीश निंबाळकर यांनी बीजप्रक्रिया आणि कमी खर्चात ऊस रोपे तयार करण्याचे सुपरकेन रोपवाटीका तंत्रज्ञान या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कृषि सहाय्यक अरविंद नाळे यांनी सेंद्रिय पद्दतीने भाजी पाल्याची पोषक परसबाग निर्मिती यावर सविस्तर माहिती दिली. यावेळी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय,फलटण च्या ग्रामीण उद्यान कार्यानुभव कार्यक्रमाच्या उद्यान दुतांनी वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक कृषि सहाय्यक योगेश भोंगळे यानी केले. कृषि सहायक राहूल कांबळे यांनी सुत्र संचालन व आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.