पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील तारळे धरणावर कळंबे येथे होऊ घातलेल्या अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्टला तारळे विभागातील 102 गावांनी आपला कडाडून विरोध कायम ठेवला आहे. हा प्रोजेक्ट कोणत्याही परिस्थितीत होवू न देण्यासाठी 102 गावातील नागरिकांनी एकत्रित येत या प्रकल्पाविरोधात आंदोलनाची भूमिका घेत प्रकल्पाचे काम काल बंद पाडले.
ज्यावेळी पर्यावरणीय जनसुनावणीची जाहीर नोटीस प्रसिद्ध झाली, त्यावेळी स्थानिकांना याबाबत माहिती झाली. त्यानंतर संपूर्ण माहिती घेऊन मार्चमध्ये झालेल्या जनसुनावणीला स्थानिकांनी प्रखर विरोध केला. तेव्हापासून प्रोजेक्टच्या विरोधात तारळे खोऱ्यात चळवळ उभी राहिली आहे. प्रोजेक्टच्या विरोधात प्रोजेक्ट विरोधी कृती समिती स्थापन झाली असून, त्यांनी तीव्र लढा सुरू केला आहे. वास्तविक, असे काम करत असताना अदानी कंपनीकडे जर अधिकृतपणे टेस्टिंग करायला परवानगी असेल, तर ती कागदपत्रे साइटवर उपलब्ध असायलाच हवी.
त्याशिवाय त्यांनी त्या कंपनीला दिलेली वर्कऑर्डरसुद्धा उपलब्ध असायला हवी. त्याचबरोबर ज्या कंपनीची मशिन सुरू आहे, ते मशिन ऑपरेट करण्याचे लायसन्स आणि इतर सर्वच परवान्याची प्रत साइटवर उपलब्ध असायला हवी; परंतु असे काहीही तिथे उपलब्ध झाले नाही. संबंधित कंपनीच्या मुंबईतील व्यवस्थापकाशी बोलल्यावर या संपूर्ण कामाबद्दल ठोस माहिती दिली नाही, तसेच काहीही कागदपत्रे सुद्धा दाखविण्याची तयारी दिसून आली नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी संपूर्ण विभागाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्या व्यवस्थापकाला काम बंद करणेस सांगितले व त्यांनीही वरील सर्व कागदपत्रे उपलब्ध नसल्याने आणि आपला स्थानिक म्हणून असलेला विरोध लक्षात घेऊन हे काम बंद केले.
प्रकल्पास विरोध ‘ही’ आहेत मुख्य कारणे…
अदानींच्या प्रकल्पास विरोध करण्याची मुख्य कारणे अनेक आहेत. त्यामध्ये वनजमीन, इकोसेन्सेटिव्ह झोन, पावसाळ्याचा सर्व्हे, गौणखनिज उत्खनन, पशुपक्षी, धरणातील माशांच्या प्रजाती, बाधित लोकसंख्येची आकडेवारी, परिसरातील पीक उत्पादन, धार्मिक स्थळांना धोका, काम करताना ब्लास्टिंगचे तारळी धरणाच्या भिंतीसह जलस्रोत व घरांचे नुकसान, भूकंपप्रवण क्षेत्र, हिंस्र प्राण्यांचे स्थलांतर, या प्रकल्पामुळे तयार होणारे दूषित पाणी, रोजगार निर्मिती, सीएसआर फंड यासह अनेक चुकीच्या गोष्टींचा सर्व्हेत समावेश करण्यात आला आहे. या मुख्य कारणावरून लोकांनी सर्व्हेवर आक्षेप घेत प्रकल्पास विरोध केला.
प्रकल्प विरोधात हजारो हरकती दाखल…
पाटण तालुक्यातील कळंबे येथे उद्योगपती गौतम अदानी यांच्या १५०० मेगावॉट वीजनिर्मिती प्रस्तावित करण्यात येत आहे. या प्रकल्प उभारणीस येथील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. या प्रकल्प विरोधात काही हरकरती असल्यास त्या दाखल करण्याचे आवाहन प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केले होते. त्यानुसार लोकांना मोठ्या संख्येने हरकती दाखल केल्या. तसेच हा प्रकल्प रेटून नेला जात असल्याची जाणीव झाल्याने व याचे भविष्यातील स्थानिकांवर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन या विरोधात कृती समितीने जनतेच्या माध्यमातून उठाव केला. तसेच या प्रकल्प विरोधात हजारो हरकती दाखल केल्या.