छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या; नातेवाईकांनी मृतदेह घेऊन गाठले पोलीस ठाणे अन् घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील एका 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीने युवकाकडून होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून घरामधील लोखंडी अँगलला साडीने गळफास घेतला. या घटनेनंतर खंडाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली. विद्यार्थिनीने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या सुसाईट नोटमध्ये युवकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर नातेवाईकांनी व सांगवी ग्रामस्थांनी विद्यार्थिनीचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका घेऊन थेट शिरवळ पोलीस ठाणे गाठले. व संबंधित युवकांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी शिरवळ पोलीस स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, शिरवळ परिसरातील एक 15 वर्षीय विद्यार्थिनी शिरवळ परिसरातील एका प्रतिष्ठीत शाळेमध्ये नववीमध्ये शिक्षण घेत होती. दरम्यान, बुधवार दि. 29 नोव्हेंबर रोजी ती पायी घरी जात असताना शिरवळ ते नायगाव जाणा-या वसतिगृहाजवळील रस्त्यावर दुचाकीवरुन आलेल्या अक्षय पोपट लांडगे (वय 20, रा.खंडाळा, ता. खंडाळा) याने तिचा विनयभंग केला. याबाबतची तक्रार शिरवळ पोलीस स्टेशनला संबंधित विद्यार्थिनीने दिल्यानंतर संबंधितांविरुध्द विनयभंग व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करीत अक्षय लांडगे याला शिरवळ पोलीसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले होते.

यावेळी गुन्हा दाखल झाल्यानंतर दुस-या दिवशी गुरुवार, दि. 30 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केल्याच्या रागातून अक्षय लांडगे याच्या दोन मित्रांनी संबंधित विद्यार्थिनीच्या घरी जात दहशत निर्माण करीत तिच्या आईचा विनयभंग केल्याची तक्रार शिरवळ पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. यावेळी 15 वर्षीय विद्यार्थिनीचे वडील हे लघुशंकेसाठी उठले असता तिने घराच्या लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी संबंधित विद्यार्थीनीला शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डाँकटरांनी तपासून मृत घोषित केले.

यावेळी शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाईक व ग्रामस्थांनी संबंधित मृतदेह रुग्णवाहिकेमधून थेट शिरवळ पोलीस ठाणे परिसरात आणला. तसेच सुसाईड नोटमधील संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी नातेवाईक, ग्रामस्थ व शिरवळ पोलीसांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने व नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने शिरवळ पोलीस स्टेशनला तणाव निर्माण झाला.

यावेळी शिरवळ पोलीसांनी संबंधितांची समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीकरीता सांगवी याठिकाणी घेऊन शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार केले. या घटनेची गणेश लोखंडे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून शिरवळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय धुमाळ,पोलीस अंमलदार तुषार कुंभार हे अधिक तपास करीत आहे.