कराड प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील सणबूर येथील एका घरात निवृत्त माध्यमिक शिक्षकासह पत्नी, मुलगा आणि मुलगी मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेमुळे कराड – पाटण तालुका हादरून गेला होता. चौघांच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय असावे याचा शोध पोलिसांकडून घेतला जात असताना त्यांच्या हाती घडलेल्या घटनास्थळी महत्वाचे धागेदोरे लागले आहेत. त्यापैकी एक म्हणजे मृतदेहाच्या खोलीमध्ये उंदीर व घुशी मारण्याच्या औषधाची ट्युब त्यांना सापडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सणबुर येथील घडलेल्या घटनेनंतर मृत दांपत्य व त्यांच्या मुलावर सणबूर या ठिकाणी तसेच विवाहित मुलीवर सासरी मंद्रुळकोळे (ता. पाटण) येथे काल रात्री उशिरा शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सणबूरचे निवृत्त माध्यमिक शिक्षक आनंदा पांडुरंग जाधव (वय ७५) यांच्या घरात त्यांच्यासह पत्नी सुनंदा (वय ६५), मुलगा संतोष (वय ४५)आणि विवाहित मुलगी पुष्पलता प्रकाश धस (वय ५२ रा. मंद्रुळकोळे, ता. पाटण) अशा चौघांचे मृतदेह सकाळी झोपलेल्या जागी अंथरुणावरच आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. आनंदा जाधव काही दिवसांपासून आजारी असल्याने कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.
मात्र, त्यांच्या तब्येतीत सुधारणा नसल्याने गुरुवारी सायंकाळी त्यांना सणबूरमध्ये घरी आणण्यात आले. श्वसनास त्रास होत असल्याने पोर्टेबल ऑक्सिजन मशिन आणि वीजपुरवठा खंडित होत असल्याने जनरेटरही आणण्यात आला होता. कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूचे कारण पोलिसांकडून शोधले जात आहे. मात्र, जनरेटरच्या धुरामुळे गुदमरून किंवा विषबाधा यापैकी एक कारण असावे, असा तपास यंत्रणेकडून अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, चौघांच्या पोटात गेलेले अन्नपाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण काय? याचा उलगडा होणार आहे. पोलिसांनी घडलेल्या घटनेच्या आदल्या दिवशी त्या रात्री घरात असलेले जेवणातील भात, चपाती, आमटी, दूध आदी पदार्थाचे नमुनेही तपासणीस घेण्यात आले आहेत.