शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी पवारांना दिलं थेट चॅलेंज; म्हणाले की,

0
1434
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आज शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना एक खळबळजनक विधान केले. “उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंंत्री करणार होते. आधी भाजपने अडीच-अडीच वर्षाचा शब्द पाळला नाही, शरद पवारांनी शिंदे ज्युनिअर असल्याचं सांगत विरोध केला असा दावा राऊतांनी केला. संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर शिंदे गटाचे नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतांना ५ वर्षांनी आता बोलायचं सुचलं का? पवारांनी किंवा त्यांच्या प्रवक्त्यांनी याबाबत खुलासा करावा, असे म्हणत थेट चॅलेंज मंत्री देसाई यांनी शरद पवार यांना दिले आहे.

सातारा येथे आज प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमास पर्यटन, खनीकर्म आणि माजी सैनिक कल्याण तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री देसाई म्हणाले की, 2019 मध्ये ज्यावेळी निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत आम्ही निवडून आलो. तेव्हा आम्हाला तब्बल 21 दिवस मुंबईमध्ये फिरवलं होतं. शिंदे साहेबांकडे बोट दाखवून उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की, आम्हाला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं आहे. एका रात्रीमध्ये असं काय घडलं?

संजय राऊत आता बोलत आहेत की पवारसाहेबांचा विरोध होता. हेच ते पाच वर्षांपूर्वी का बोलले नाहीत? अजून सुद्धा पवार साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसतात. माझं आव्हान आहे शरद पवारांच्या प्रवक्त्यांनी सांगावं आमचा एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध होता. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला खासगीत सांगितले होते की हा अधिकार फक्त उद्धव ठाकरे यांचा आहे, यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे देखील मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

मविआ तयार करुन सरकार बनवलं पाहिजे ही एकनाथ शिंदे यांची भूमिका होती. यावर आज सकाळी माध्यमांशी प्रतिनिधींनी राऊत यांना विचारले की, “एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करु नका, असं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं का?” त्यावर राऊत ‘हो म्हणाले. यात लपवण्यासारखं काय आहे?’ “भाजप बरोबर आम्ही सरकार बनवलं असतं, त्यांनी शब्द पाळला असता, तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. दुसऱ्या कोणाचा प्रश्नच नव्हता. उद्धव ठाकरे या बाबतीत प्रामाणिक आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करुन तसा सिग्नल दिला होता. पण भाजपने शब्द पाळला नाही. म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनू शकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसनेच त्यांना मुख्यमंत्री बनू दिलं नाही” असं संजय राऊत म्हणाले.