कराड प्रतिनिधी | मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची १७ नोव्हेंबर रोजी कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर मध्यरात्री सभा झाली. त्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांवर गुन्हा दाखल केला. परंतु त्याची नोटीस तब्बल एक महिन्याने पाठवली आहे. नोटीसीत अनेक अटी-शर्ती टाकल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे.
14 जणांवर गुन्हा दाखल
मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेदिवशी मराठा बांधवांनी प्रशासनाला सहकार्य केले. सभा शांततेत पार पाडली. त्यानंतर १९ नोव्हेंबरला मराठा क्रांती मोर्चाच्या १४ समन्वयकांवर कराड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्या संदर्भात संबंधितांना कसलीही सूचना दिली नाही. थेट नोटीसा पाठवल्या. बहुतांश जणांनी नोटीस स्वीकारली नाही. यासंदर्भात सोमवारी (दि. २५) चौकशीला बोलविले होते. मात्र, नोटीसा घेणारे आज चौकशीला गेले नाहीत.
अटी-शर्तीसह दिली नोटीस
कराड शहर पोलिसांनी १४ मराठा बांधवांवर केलेली कारवाई वादात सापडली आहे. गुन्हा दाखल केल्याची सूचना संबंधितांना एक महिन्याने नोटीस पाठवून दिली. त्यातच नोटीसमध्ये अटी-शर्ती घातल्यामुळे मराठा समाजात तीव्र संताप आहे. १४ पैकी बहुतांश जणांनी नोटीस घेतली नाही. ज्यांनी नोटीस घेतली ते आज (सोमवारी) पोलीस ठाण्यात हजर राहिले नाहीत.
जमावाने पोलीस ठाण्यात जाणार
पोलिसांच्या या कारवाईला मराठा बांधव सामोरे जाणार आहेत. गुरूवारी (दि. २८) शेकडो मराठा बांधव एकत्र येणार आहेत. त्यानंतर जमावाने ते कराड शहर पोलीस ठाण्यात जाणार आहेत. आम्हा सर्वांवर गुन्हे दाखल करा, असा पवित्रा त्याठिकाणी घेतला जाणार आहे.