सातारा प्रतिनिधी । सध्या सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने धोम बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी धरणामध्ये पाण्याची आवक वाढत आहे. दि. २२ जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता 2 हजार क्युसेस पाणी कृष्णा नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. तसेच धरणातील पाण्याच्या आवकमध्ये वाढ होत असल्याने नदीकाठी असलेल्या ग्रामस्थाना प्रशासनाकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सततच्या पावसामुळे नियोजित वेळेपुर्वी पाणी सोडण्याची शक्यता प्रशासनाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे बलकवडी धरण परिसरात असलेली बलकवडी, परतवडी, कोढवली नांदवणे, वयगाव, दह्याट, बोरगाव या गावातील ग्रामस्थांना नदीपात्रात जाऊ नये. तसेच ग्रामस्थांनी जनावरे नदी पात्रात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे देखील आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
दरम्यान, धोम बलकवडी धरणा परिसरात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. गेली दोन दिवस संततधार पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले असून ओढे-नाल्याना नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र (उफळे) फुटले आहेत. धोम व बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील परिसरात मुसळधार पावसाने धरण पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे.