सातारा प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जात आहे. सातारा शहरातील हातगाडीधारकांनी देखील आपली दुकाने रात्री अकरा वाजता बंद करावीत. अकरानंतर जर कोणत्याही कारणाने दुकान उघडे राहिल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी पदाधिकाऱ्यांना आचारसंहितेच्या नियमावलीची माहिती दिली.
यावेळी ते म्हणाले की, विधानसभा निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून योग्य ती दक्षता घेण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील हातगाडीधारकांनी देखील आचारसंहितेच्या नियमावलीचे पालन करून आपली दुकाने रात्री अकरापर्यंत बंद करावीत.
यानंतर जर कोणते दुकान सुरू राहिले तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. कायद्यात दंडात्मक कारवाईची तरतूद असून, याबाबत दुकानातील कर्मचाऱ्यांनाही अवगत करावे. पोलिस दलाने तपासणीसाठी तीन पथकांची नेमणूक केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.