सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील मायणी येथे हरिष उर्फ दादा बबन साठे (वय ३५, रा. इंदिरानगर, मायणी) याचा धारदार हत्याराने खून करणारा आरोपी बापू महादेव पाटोळे (वय ३८, मूळ रा. रामोशी गल्ली, मायणी, ता. खटाव, जि. सातारा) यास जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
याबाबतची अधिक माहिती अशी, २१ सप्टेंबर २०१७ रोजी सायंकाळी पाच ते २२ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी सहाच्या दरम्यान फिर्यादी बबन साठे यांचा मुलगा हरिष उर्फ दादा बबन साठे (वय ३५) यास बापू महादेव पाटोळे (रा. मायणी) व त्याच्या सोबतचे अनोळखी इसम यांनी मायणी गावच्या हद्दीत फुलेनगरकडे जाणाऱ्या रोडच्या कडेस थडग्याजवळ धारदार हत्याराने गळ्यावर वार करून त्याचा खून केला होता. बापू महादेव पाटोळे व एक अनोळखी इसम हे माझ्या घरी सायंकाळी सातच्या सुमारास आले होते. ते माझ्या मुलाची चौकशी करत होते म्हणून त्यांनीच माझा मुलगा दादा याचा खून केल्याची तक्रार बबन साठे यांनी दिली होती.
या गुन्ह्याच्या तपास वडूजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. डी. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली मायणी पोलीस दूरक्षेत्राने केला. साक्षीदारांचे जबाब नोंदविले तसेच कागदोपत्री पुरावा जमा केला व आरोपीविरूद्ध वडूज येथील जिल्हा न्यायालयात दोषारोप दाखल केले. वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अजित प्र. कदम (साबळे) यांनी काम पाहिले. यामध्ये ८ साक्षीदार सरकार पक्षाच्या वतीने तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाबजबाब, कागदोपत्री पुरावा व सरकारी वकील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. कोले यांनी आरोपीला दोषी ठरवून आरोपी बापू महादेव पोटोळे यास जन्मठेप व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
याकामी सरकारी वकील, सदर खटला चालविणे कामी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्वीनी शेंडगे, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव, पोलिस कॉन्स्टेबल जयवंत शिंदे, कॉन्स्टेबल अमीर शिकलगार, हवालदार विजयालक्ष्मी दडस, कॉन्स्टेबल ढोले, कॉन्स्टेबल सागर सजगणे यांनी सहकार्य केले.