कराड प्रतिनिधी | मलकापूर, ता. कराड गावच्या हद्दीत मंगळवारी (दि. 15) मध्यरात्री 1.30 च्या सुमारास एका कारमधून तीन कोटी रुपयांची रोकड लुटणारी दहा जणांची टोळी सातारा पोलिसांनी जेरबंद केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलिसांच्या संयुक्त पथकांनी ही कारवाई केली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर साताऱ्यात पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, यापूर्वी काही आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून 2 कोटी 89 लाख 34 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आला आहे. मुंबईतील एका पार्टीची रोकड घेऊन जाणारी कार अडवून, दरोडा टाकण्यात आला होता. आसिफ सलीम शेख (रा. शिंदे गल्ली, कराड), सुलताना शकील सय्यद (रा. मंगळवार पेठ, करडी पिराजवळ, कराड), अजमेर उर्फ अज्जू मोहम्मद मांगलेकर (वय 36, रा. गोळेश्वर, कार्वे नाका, कराड), नजर मोहम्मद मुल्ला (वय 33, रा. 262, रविवार पेठ, कराड), ऋतुराज धनाजी खंडक (वय 29) व हृषीकेश धनाजी खंडक (वय 26, दाघे रा. तांबवे, ता. कराड), करीम अजित शेख (वय 35, रा. 192, मंगळवार पेठ, कराड),
अक्षय अशोक शिंदे (वय 29, रा. तामजाई गल्ली, तांबवे, ता. कराड), नजीर बालेखान मुल्ला (वय 33, रा. राजीवनगर, सैदापूर, कराड), शैलेश शिवाजी घाडगे (वय 24) आणि अविनाश संजय घाडगे (वय 29, दोघे रा. निमसोड, ता. खटाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
त्यांच्याकडून दोन कोटी 89 लाख 34 हजार रुपयांची रोकड, मारुती स्विफ्ट, टोयोटा इनोव्हा आणि मारुती सियाझ या कार आणि दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. संशयितांना न्यायालयाने मंगळवार, दि. 22 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील एक संशयित फरारी आहे.
दरोड्यातील उर्वरित 11 लाख रुपयांची रोकड जप्त करणे बाकी आहे. ही रक्कम हवालामधील आहेत. सक्तवसुली संचालनालय, राज्य निवडणूक आयोग, प्राप्तिकर आणि जीएसटी विभागांना या प्रकरणाची खबर देण्यात आली आहे. या रकमेची खातरजमा सर्व पातळ्यांवर करण्यात येणार असून, या मागील सत्य लवकरच जनतेसमोर आणणार आहे.
नेमका कसा घडला दरोड्याचा प्रकार
शैलेश घाडगे व अविनाश घाडगे हे मंगळवारी (दि. 15) रोजी मुंबई येथील एका पार्टीची तीन कोटी रुपयांची रोकड ह्युंदाई क्रेटा कारमधून घेऊन कर्नाटकातील हुबळी येथे निघाले होते. कराड हद्दीत कोल्हापूर नाक्यावरून कोल्हापूरकडे जाताना पांढर्या रंगाच्या मारुती स्विफ्ट कारने क्रेटा कारचा पाठलाग केला. ढेबेवाडी फाट्याच्या पुढे दोन अनोळखी मुले आणि दोन दुचाकीवरून आलेले अनोळखी लोक, अशा पाच जणांनी क्रेटा कार अडवून, कारची तोडफोड केली. कारमधील दोघांना जिवे मारण्याची धमकी देऊन, त्यांच्याकडील रोकड काढून घेतली. क्रेटा कारमधील दोघांचे हातपाय बांधून नांदलापूर, ता. कराड गावाच्या आधी त्यांना सोडून देण्यात आले. तुम्ही सरळ कोल्हापूर बाजूने निघून जा, असे सांगून धमकी देणारे पाच जण निघून गेले.
दहा जणांची नावे निष्पन्न अन् 24 तासांत आरोपी ताब्यात
याबाबतची तक्रार दाखल होतात कराड शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी मोबाइलच्या लोकेशनचे विश्लेषण करून, काही जणांची कसून चौकशी केली. त्यात दहा संशयितांची नावे निष्पन्न झाली. या संशयितांना पोलिसांनी अवघ्या 24 तासांत ताब्यात घेऊन, जवळपास 90 टक्के रक्कम जप्त केली आहे. या गुन्ह्याचा एक मास्टरमाइंड ताब्यात आला असून, दुसरा मास्टरमाइंड पोलिसांच्या रडारवर आहे.
‘या’ जबाज पोलिसांनी मोहीम केली फत्ते…
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. मते, अमोल साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक शीतल माने, अशोक वाडकर, अमोल साळुंखे, सपना साळुंखे, राजेंद्र गायकवाड, अनिल स्वामी, संदीप कुमार, प्रदीप कोळी, संतोष पाडळे, संदीप शेडगे, अमोल देशमुख, अमित चव्हाण, शरद बेबले, प्रवीण फडतरे, गणेश कापरे, मुनीर मल्ला, अमित माने, मोहन पवार, स्वप्निल दौंड, शिवाजी भिसे यांनी ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी या कारवाईबद्दल पोलिसांचे अभिनंदन केले.